लाखनीतालुक्यातील निमगाव येथील घटना
कालिदास खोब्रागडे जिल्हा विशेष प्रतिनिधी भंडारा मो. 95459 14324
भंडारा :- मळणी यंत्राने धानाची मळणी करीत असताना मळणी यंत्रात युवकाचा हात जाऊन युवक गंभीर जखमी झाल्याची घटना निमगाव येथे शुक्रवारी(ता.२३) दुपारचे सुमारास घडली. जखमी युवकाचे नाव प्रशांत ज्ञानेश्वर कोरे(२१) रा. झरप, ता. लाखनी असे आहे. त्याचेवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे.
जखमी प्रशांत हा शाम भोयर निमगाव यांचे मळणी यंत्रावर मागील ५ ते ६ वर्षापासून चालक म्हणून कामावर जातो. आजही ते निमगाव येथे एका शेतकऱ्याचे धानाची मळणी करीत असताना अचानक मळणी यंत्रात त्याचा हात गेल्याने तो गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी भंडारा येथील एका खासगी दवाखान्यात भर्ती करण्यात आले. तपासणी नंतर त्याचेवर ३ शस्त्रक्रिया कराव्या लागणार असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. वृत्त लिही पर्यंत त्याचेवर पहिली शस्त्रक्रिया सुरू होती. मळणी यंत्र मालक उपचाराचा काही खर्च देणार असल्यामुळे पोलिसांत तक्रार केले नसल्याचे सामाजिक कार्यकर्ता अजय हेमने यांनी सांगितले.


0 टिप्पण्या