चुलबंद च्या मांढळ आणि वैनगंगेच्या इटान घाटावरील प्रकार
कंत्राटदाराचे पोलिस व महसूल विभागाशी अर्थपूर्ण संबंध
कालिदास खोब्रागडे जिल्हा विशेष प्रतिनिधी भंडारा मो. 95459 14324
भंडारा :- महसूल विभागाने चुलबंद नदी घाटावरील मांढळ आणि वैनगंगेच्या इटान रेतीघाटालगत खासगी जागेतील माती मिश्रित रेती काढण्याची परवानगी दिली असली तरी खानिकर्म महसूल व पोलिस विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांशी कंत्राटदाराच्या अर्थपूर्ण संबंधामुळे या परवानगी आड रेती घाटातील रेती उपसा व वाहतूक करून रेती तस्करी केली जात असल्याचे वास्तव उघडकीस आल्याने शासनाचा महसूल बुडून पर्यावरणाचा अपरिमित नुकसान होत आहे. यावर अंकुश लावण्याकरिता जिल्हाधिकारी व जिल्हा पोलिस अधीक्षक काही उपाय योजना करतील काय ? याकडे जिल्हा वासियांचे लक्ष लागले आहे.
जिल्ह्यातून प्रवाहित होणारी वैनगंगा व तिच्या उपनदयात पांढरी शुभ्र, बारीक व दर्जेदार रेती उपलब्ध असल्यामुळे बांधकाम क्षेत्रात जिल्ह्यासह बाहेरही प्रचंड प्रमाणात मागणी आहे. पण जिल्ह्यातील रेती घाटांचे लिलाव झाले नसल्यामुळे चोरट्या मार्गाने रेती घाटातील वाळूचा उपसा केल्यास पोलिसांचे धाडसत्र सुरू आहे किंवा चोरट्या मार्गाने रेती वाहतूक करतांना सापडल्यास पोलिस विभागाकडून गुन्हा दाखल केला जातो. अथवा महसूल विभागाकडून प्रती ट्रॅक्टर एक ते सव्वा लाख रुपये दंड वसूल केला जातो. या पासून मुक्ती मिळविण्याकरिता रेती तस्करांनी शक्कल लढवून रेती घाटालगत असलेल्या खासगी जमिनीतून माती मिश्रित रेतीचा उपसा करून वाहतूक करण्याची परवानगी घेऊन संबंधित विभागाचे आशीर्वादाने बिनबोभाट नदी पात्रातून रेतीची तस्करी केली जाते.
साकोली उपविभागात चूलबंद नदी मांढळ रेती घाट आणि वैनगंगेच्या इटान रेती घाटालगत किवा नदी काठावर असलेल्या खासगी जमिनीतून माती मिश्रित रेती काढण्याची परवानगी महसूल विभागामार्फत देण्यात आली. कंत्राटदाराने या कालावधीत लिज वर घेतलेली जागा सोडून परिसरातील १० ते १२ ट्रॅक्टर भाड्याने घेऊन नदी घाटातील रेतीचा उपसा करून नदी काठावर रेती साठा करून टीप्पर चे माध्यमातून जिल्ह्यासह बाहेरील जिल्ह्यात पाठवून रेती तस्करी केली जात असे. या बाबद खनिकर्म, पोलिस व महसूल विभागातील स्थानिक अधिकारी, कर्मचाऱ्यांना माहिती होती. पण कंत्राटदाराशी अर्थपूर्ण संबंधामुळे रेती तस्करीकडे हेतुपुरस्पर दुर्लक्ष केले जात असे.
या प्रकाराने शासनाचा महसूल बुडाला व पर्यावरणाचेही नुकसान झाले. या शिवाय अवजड रेती वाहतुकीमुळे रस्त्यांची दुर्दशा झाली. आवश्यकतेपेक्षा अधिक खोल रेती उपसा केल्यामुळे भूगर्भात पाण्याच्या नीचऱ्याअभावी पाणी पुरवठा योजनांना पर्याप्त पाणी उपलब्ध होणार नाही. परिणामी ग्रामस्थांना जल संकटाचा सामना करावा लागणार आहे. रेती तस्करीमुळे कंत्राटदार व संबंधित विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांचे उखळ पांढरे होणार असले तरी पर्यावरणाचे नुकसान होऊन गावकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागणार आहे. या गंभीर बाबीकडे जिल्हाधिकारी व जिल्हा पोलिस अधीक्षकांनी लक्ष पुरवून माती मिश्रित रेती परवानगी आड होणाऱ्या रेती तस्करीवर लगाम लावणे गरजेचे झाले आहे.
*असे फुटले रेती तस्करीचे बिंग(चौकट)*
चुलबंद नदी काठालगत असलेला खासगी गट क्रमांक ९९० आराजी २.०७ हेक्टर आर जागेपैकी ०.१५ आर जागेतून माती मिश्रित रेती काढण्याची करांडला येथील एका व्यवसायिकास परवानगी देण्यात आली होती. त्याने १० ते १२ ट्रॅक्टर भाड्याने घेऊन नदी पात्रातील रेती बाहेर काढणे सुरू केले होते. पण अपघात होऊन एकाचा मृत्यू झाल्याने रेती तस्करी चे बिंग फुटले.


0 टिप्पण्या