वादळी मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले तर पिकांचे मोठे नुकसान झाले.
भवन लिल्हारे उपसंपादक ( चित्रा न्युज महाराष्ट्र राज्य ) मो. नं.9373472847
भंडारा : जिल्ह्यातील मोहाडी व भंडारा तालुक्यातील अनेक भागात रविवारला दुपारच्या सुमारास पुन्हा एकदा वादळी मुसळधार पावसाचा दणका बसला. वादळी वाऱ्यामुळे शाळा, महाविद्यालय, कौलारू घरे व टिनाचे शेड उडाली. मुसळधार पावसाने कौलारू घरांची हाणी झाली. शेतशिवार व रस्त्यांवरील झाडे उन्मळून कोसळली. यामुळे मोहाडी शहरातील अनेक रस्ते बंद पडले होते. वादळी मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले तर पिकांचे मोठे नुकसान झाले.
राज्यात मान्सूनला अद्यापही उशिर असतांना भंडारा जिल्ह्यात अवकाळी पावसाने दोन दिवसांपासून थैमान घातले आहे. शनिवारला मोहाडी व पवनी तालुक्यात अनेक ठिकाणी वादळी पाऊस झाला. पालांदूर येथील आठवडी बाजारात धावपळ उडाली. शेतीचे नुकसान झाले. रविवारला पुन्हा मोहाडी व भंडारा तालुक्यातील अनेक भागात दुपारच्या सुमारास वादळी मुसळधार पावसाच्या धारा कोसळल्या. मोहाडी शहरात वादळामुळे घरांवरील टिनाचे शेड उडाले. शेतातील भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाले. जवाहरनगर परिसरातही वादळी पावसाने हाल झाले.
भंडारा जिल्ह्याला गारांसह वादळी पावसाचा तडाखा;
भाजीपाला व उन्हाळी धान पीक अडचणीत
मोहाडी व पवनी तालुक्यातील अनेक भागात शनिवारला सायंकाळच्या सुमारास अवकाळी वादळी पावसाने हजेरी लावली. मोहाडी परिसरात गारपीटीने झोडपून काढले. यामुळे शेतशिवारातील उन्हाळी धान पीक जमिनीवर लोळले. तसेच भाजीपाला पिकाची हानी झाली .
शनिवारला अचानक मोहाडी व पवनी तालुक्यात वादळी वाऱ्यासह पाऊस बरसला तर काही ठिकाणी गारपिट झाली. यामुळे शहरांसह ग्रामीण भागात एकच धावपळ उडाली. यामुळे शेतशिवारात कापून ठेवलेल्या उन्हाळी धानाच्या कळपा पाण्यात भिजल्या. त्यामुळे पाखर धान होण्याची शक्यता आहे. उभे धान जमिनीवर लोळल्याने कापणीचा खर्च वाढणार आहे. उन्हाळी मूंग व उळीद व अन्य भाजीपाला पीक यांचेही गारपिटीने नुकसान झाले.


0 टिप्पण्या