लाखनी येथील घटना
७ लाख ७० हजाराचा मुद्देमाल जप्त
कालिदास खोब्रागडे जिल्हा विशेष प्रतिनिधी भंडारा मो. 9545914324
भंडारा :- प्राण्यांना निर्दयतेने वागविने व कत्तल करण्याच्या उद्देशाने विना परवाना वाहतूक केल्यास कठोर कायदे अस्तित्वात असले तरी यास बगल देऊन १० गोवंशाना पायाला दोराने बांधून पिडादायक रित्या भरगच्च बोलेरो पिक अप द्वारे वाहतूक केल्याची घटना रविवारी (ता.२५ ) सकाळी ५.३० वाजताच्या सुमारास उघडकीस आली. लाखनी पोलिसांनी बोलेरो पिक अप गाडीसह १० गोवंश किंमत ७ लाख ७० हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करून बोलेरो पिक अप चालक अनिकेत मुरलीधर उताणे वय २० रा. लावेश्वर व लंकेश दिनेश डाकरे वय १९ रा. पांजरा यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा पोलीस निरीक्षक मिलिंद तायडे यांच्या मार्गदर्शनात तपास सुरु आहे.
बोलेरो पिक अप गाडी क्रमांक एम.एच ३६ / ए ए ०८७७ ने कत्तलखान्यात जनावरे नेण्यात येत असल्याच्या गुप्त माहिती वरून लाखनी पोलिसांनी पहाटे ५.३० वाजताच्या सुमारास गडेगाव उड्डाणपूल परिसरात नाकाबंदी केली. दरम्यान बोलेरो पिक अप गाडी भरधाव वेगाने जात असल्याचे दिसून आल्याने चालकास थांबण्यासाठी पोलिसांनी इशारा दिला. पण चालकाने पोलिस इशाऱ्यास न जुमानता भरधाव वेगाने निघण्याचा प्रयत्न केला मात्र त्याला तिथेच पकडण्यात पोलिसांना यश आले. पंचा समक्ष पोलिसांनी गाडीची तपासणी केली असता गाडीत १० गोवंश दाटीवाटीने बांधलेले दिसून आले. पोलिसांनी विचारपूस केली असता सदर जनावरे नागपूर येथे कत्तलीसाठी घेऊन जात असल्याचे सांगितल्याने १० गोवंश किंमत ७० हजार रुपये आणि बोलेरो पिक अप किंमत ७ लाख रुपये असा एकूण ७ लाख ७० हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. लाखनी पोलिसात बोलेरो पिक अप चालकावर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली. घटनेचा पोलीस निरीक्षक मिलिंद तायडे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक सचिन सूर्यवंशी तपास करीत आहेत. जप्त केलेले जनावरे पालन पोषणासाठी बरडकिंन्ही येथील गोशाळेत पाठविण्यात आली आहेत.


0 टिप्पण्या