Ticker

6/recent/ticker-posts

जुने कपडे संकल्प शिबिराला अकोलेकरांचा भरभरून प्रतिसाद


कपड्यांसह गृहोपयोगी वस्तूंचेही झाले संकलन; ॲड. धनश्री देव स्मृती सेवा प्रकल्पाचा उपक्रम

अकोला :- ॲड. धनश्री देव स्मृती सेवा प्रकल्पाद्वारे रविवार 25 जून रोजी जुने कपडे संकल्प शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या संकल्प शिबिराला अकोलेकरांनी अगदी सहृदयतेने भरभरून प्रतिसाद दिला. या संकल्प शिबिरात जुन्या कपड्यांसह गृहोपयोगी वस्तू आणि बुट सुद्धा मिळाले.
      विविध अभिनव पद्धतीने सामाजिक कार्यासाठी लोकप्रिय ठरलेल्या ॲड. धनश्री देव स्मृती सेवा प्रकल्पाद्वारे संचालित निलेश देव मित्र मंडळाने आतापर्यंत अकोल्यात विविध लोकोपयोगी, पर्यावरणपूरक व समाजहिताचे उपक्रम राबविले. याच उपक्रमांचा एक भाग म्हणून रविवार 25 जून रोजी जुने कपडे संकल्प शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या आयोजनाअंतर्गत स्थानिक जठारपेठ येथील अष्टविनायक रेसिडेन्सीसह चार  ठिकाणी अकोलेकरांनी त्यांच्याकडचे जुने परंतु चांगले वापरण्यायोग्य कपडे तसेच इतर जुन्या वस्तू आणून देण्याचे आवाहन करण्यात आले होते. या आवाहनानुसार दोन हजाराच्या जवळपास अकोलेकरांनी त्यांच्याकडील जुने परंतु चांगले स्थितीत असलेले वापरण्या योग्य कपडे आणून दिले. चार ठिकाणी हे जुने कपडे संकलन करण्यात आले. यामध्ये जवळपास एक मिनी ट्रक भरेल एवढे कपडे संकलित झाले.
      आता यातील जे कपडे चांगले वापरण्या योग्य आहेत ते कपडे मेळघाट मध्ये जाऊन 1 जुलै रोजी तेथील गोरगरीब नागरिकांना दिल्या जाणार आहेत. तसेच जीन्स, होजिअरी यासारखे कपडे पुण्याला पाठवून त्या कपड्यांवर प्रक्रिया करून त्यापासून पॅड बनविल्या जातील व या पॅडचे सुद्धा मोफत वितरण केले जाणार आहे, अशी माहिती निलेश देव मित्र मंडळाचे प्रमुख निलेश देव यांनी दिली. या अभियानात एक वाशिंग मशीन , एक कुलर, एक शिलाई, मशीन, दोन सिलिंग फॅन व अनेक बुटांचे जोड प्राप्त झाले आहेत. ते सुद्धा गोरगरीब नागरिकांना मोफत वाटप केल्या जाणार आहेत, असेही निलेश देव यांनी सांगितले असून या उपक्रमाला दिलेल्या भरभरून प्रतिसादाबद्दल त्यांनी अकोलेकरांचे आभार व्यक्त केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या