Ticker

6/recent/ticker-posts

सामाजिक न्याय दिनी समाजकल्याण कार्यालयासमोर वंचितचा आंदोलनाचा इशारा !


 चंद्रशेखर वाघमारे पपु निवळीकर संपादक महा चित्रा न्युज मो.8888117975

हिंगोली: -  जिल्ह्यातील सामजिक न्याय विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या विविध मागण्या पूर्ण करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्यावतीने आज महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांना सहायक आयुक्त समाजकल्याण विभाग हिंगोली यांच्या मार्फत निवेदन देण्यात आले. 
 
यामध्ये पुढील प्रमाणे मागण्या करण्यात आल्या आहेत. हिंगोली जिल्ह्यात कळमनुरी या ठिकाणी एक निवासी शाळा आहे. त्या शाळेची संख्या वाढवुन प्रत्येक तालुका निहाय 1 आणि हिंगोली जिल्हा मुख्यालयी 2 अशा एकुण 6 निवासी शाळा देण्यात याव्या.

अॅट्रासिटी प्रलंबित प्रकरणात निधी तात्काळ वितरीत करण्यात यावा. जिल्हयात 77 गुन्ह्यांतील 148 अत्याचार पिडीतांना 1.5 कोटी निधी देणे बाकी आहे तो तात्काळ देण्यात यावा. डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजने अंतर्गत 2020-21 या वर्षाचा 90.49 लाख रू व 2021-22 1.71 लाख रू. निधी तात्काळ देण्यात यावा. 

कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजनातंर्गत शासनाकडुन जमिन खरेदी करून लाभार्थ्यांना तात्काळ देण्यात याव्या. बार्टीच्यावतीने अनु. जातीच्या विद्यार्थ्याकरीता चालविण्यात येणाऱ्या स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन केंद्रे तात्काळ शासनाच्यावतीने सुरू करण्यात यावे, कोणत्याही संस्थाना देवु नये. मागील स्पर्धा परिक्षाचे विद्यावेतन 1 महिण्याचे देण्यात आलेले नाही. संबंधित विद्यार्थ्यांना तात्काळ विद्यावेतन देण्यात यावे.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर विशेष पुरस्कार योजना मार्च 2021 ला घोषणा केली होती, अनु. जातीचे विद्यार्थी दहाविला 90% पेक्षा जास्त गुण घेणाऱ्याला ही योजना लागु होती पण, सरकारने केवळ जाहिरातबाजी करून मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. 2 लाख विशेष पुरस्कार दिले असते, तर डॉक्टर होण्याऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण वाढले असते ही योजना तात्काळ सुरू करावी.

मागासवर्गीय मुला - मुलींच्या वसतीगृहातील भोजन ठेका दरवर्षी ठराविक एकाच एजन्सीला दिल्यामुळे अधिकारी व ठेकेदार यांचे संगनमत असल्याने अनु. जाती विद्यार्थ्यांना योग्य सकस जेवण मिळत नाही, याची चौकशी करून संबंधित टक्केवारी घेणारे अधिकारी व देणारे ठेकेदार यांच्यावर कार्यवाही करावी.

भारत सरकारची मॅट्रीकत्तोर शिष्यवृत्ती MAHADBT शिष्यवृत्ती 3 वर्षे झाले, अद्यापही मिळाली नाही अशा अनेक विद्यार्थ्यांच्या तक्रारी आहेत. यामधील जाचक अटी रद्द करून लवकरात लवकर विद्यार्थ्यांच्या खात्यावर जमा करावी.

यासह अनेक विषयांवर वंचित बहुजन आघाडी हिंगोली जिल्हा शाखेच्यावतीने निवेदन सादर करण्यात आले. या मागण्यांवर शासनाचे लक्ष वेधुन घेण्यासाठी सामाजीक न्याय दिनी म्हणजे 26 जून रोजी सामाजिक न्याय भवन हिंगोलीच्या समोर तीव्र स्वरूपाचे धरणे आंदोलन करु असा इशारा वंचित बहुजन आघाडी मराठवाडा विभागीय सदस्य रविंद्रभाऊ वाढे यांनी दिला.

यावेळी  हिंगोली जिल्हा महासचिव डॉ.दीपक डोनेकर,जिल्हा संघटक शेख अतीखुर रहेमान,युवा आघाडीचे जिल्हा अध्यक्ष योगेश नरवाडे,ऍड.डी.बी.खंदारे,शिवाजी इंगोले,सुनील रणवीर आदी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या