• तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनास मनाई
• धूम्रपान करणाऱ्याविरुद्ध होणार दंडात्मक कारवाई
कालिदास खोब्रागडे जिल्हा विशेष प्रतिनिधी भंडारा मो. 9545914324
भंडारा:- तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांचे सेवनामुळे असंसर्गजन्य आजारसह संसर्गजन्य रोगांचा प्रादुर्भाव होत असल्यामुळे शासकीय, निमशासकीय व खाजगी कार्यालय शिक्षण संस्था, उपहारगृह तथा परिसरात तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाचे सेवन करणे धूम्रपान व थुंकण्यावर प्रतिबंध लावण्यात आला असून प्रभावी अंमलबजावणीसाठी दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी तंबाखूजन्य उत्पादन बाळगणे व वापरण्यास मनाई आहे. सूचनांचे पालन न करणाऱ्यांवर २०० रुपये दंड आकारण्यात येणार आहे.
तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे मानवी शरीरावर दुष्परिणाम होतो. त्यामुळे कर्करोग, हृदयविकार, मानवी हृदयाशी निगडित रोग, फुफ्फुसाचा कर्करोग या सारखे असंसर्गजन्य आजार होत असून त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान व थुंकल्यास त्यातून स्वाईनफ्ल्यू, क्षयरोग, निमोनिया आणि पोटाचे विकार इत्यादी संसर्गजन्य आजार पसरतात. त्यामुळे दरवर्षी ८ ते ९ लाख मृत्यू यापासून होतात. सार्वजनिक ठिकाण ज्यात शासकीय, निमशासकीय, खाजगी कार्यालय, शासकीय संस्था, कार्यालयातील कामाची जागा, उपहार गृह व शाळा, महाविद्यालय यांचा समावेश होतो. तेथे नागरिकांच्या संरक्षणाकरिता सिगरेट पिणे, तंबाखू खाणे, थुंकने, धूम्रपान करण्यास प्रतिबंध असून धूम्रपान व थुंकने हा दंडात्मक गुन्हा असल्याने भारतीय दंड संहितेच्या कलम २६८ मध्ये अंतर्भूत केल्याप्रमाणे ज्यामुळे जनतेला अथवा आजूबाजूला राहणाऱ्यांना, ज्यांची मालमत्ता व वहिवाट आहे. अशा सर्व लोकांना नुकसान, धोका किंवा त्रास होतो. अशी कोणतीही कृती करणारा व्यक्ती सार्वजनिक उपयोगाबद्दल दोषी राहील.
जनसामान्यांच्या आरोग्याच्या दृष्टीकोनातून शासकीय इमारती स्वच्छ राहण्यासाठी "स्वच्छ भारत, स्वस्थ भारत" मोहिमेद्वारे शासकीय इमारतींची साफसफाई करून शासकीय कार्यालये व परिसर तंबाखू मुक्त परिसर असल्यामुळे इमारतीसह आवारामध्ये तंबाखूजन्य उत्पादने बाळगणे व वापरण्यास मनाई करण्यात आली आहे. सूचनांचे पालन न करणाऱ्यास २०० रुपये दंड आकारून वसूल करण्यात येणार आहे. जमा झालेली सर्व रक्कम आरोग्य विभागाकडे वर्ग करण्यात येणार आहे.


0 टिप्पण्या