Ticker

6/recent/ticker-posts

लाखनी तालुक्यात सरासरीपेक्षा कमी पर्जन्यमानाची नोंद



• सरासरी पेक्षा १९ टक्के पाऊस कमी


• धान उत्पादक दमदार पावसाचे प्रतीक्षेत 

कालिदास खोब्रागडे जिल्हा विशेष प्रतिनिधी भंडारा मो. 9545914324

भंडारा :-लाखनी तालुक्यात १ जून ते ९ जुलै या कालावधीत ३५६ मिलिमीटर सरासरी पाऊस पडतो. मागील खरीप हंगामात याच कालावधीत ४४६.३ मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली होती. तर खरीप हंगाम २०२३ मध्ये याच कालावधीत २८९.८० मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली असून सरासरी टक्केवारी ८१ टक्के आहे. सरासरीपेक्षा कमी पर्जन्यवृष्टीमुळे हजारो धान उत्पादक शेतकरी पाण्याचे प्रतीक्षेत आहेत. 
        साकोली व लाखांदूर तालुक्याचे विभाजन करून लाखनी तालुक्याची निर्मिती करण्यात आली. भौगोलिक क्षेत्र ३३ हजार २७३.३६  हेक्टर असून खरीप पिकाखालील सर्वसाधारण क्षेत्र २० हजार ६९८ हेक्टर आहे. त्यापैकी खरीप हंगाम २०२३ मध्ये २० हजार ६९८.५६ हेक्टर क्षेत्रात धान पिकाची लागवड करण्यात येणार आहे. तालुक्याचे १ जून ते ९ जुलै पर्यंत सरासरी पर्जन्यमान ३५६ मिलिमीटर आहे. रोहिणी नक्षत्रापासून पावसाची सुरुवात होत असते. चालू खरीप हंगामात रोहिणी व मृग कोरडा गेला. तर   आद्रा नक्षत्राचे सुरुवातीला पावसाने हजेरी लावल्यामुळे मुदतीत पेरणी आटोपली. त्यानंतर आठवडाभर पावसाने दडी मारली. आद्रा नक्षत्र संपण्यापूर्वी दमदार पावसाने हजेरी लावल्यामुळे रोवणीला सुरुवात झाली. तालुक्यात लाखनी, पिंपळगाव, पोहरा, पालांदूर व मुरमाडी/तूप. अशी ५ महसूल मंडळ असून मुरमाडी/तूप. वगळता बाकी ठिकाणी पर्जन्य मापक यंत्र बसविण्यात आले आहे. १ जून ते ९ जुलै या कालावधीत लाखनी २६९.९० मिलिमीटर, पोहरा ३२९.६० मिलिमीटर, पालांदूर/चौरास ४३४.५० मिलिमीटर तर पिंपळगाव/सडक २५६.३० मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली असून त्याची सरासरी २८९.९० मिलिमीटर म्हणजेच सरासरीच्या ८१ टक्के पाऊस झाला आहे. या कालावधीत साधारणत: ३५६ मिलिमीटर पाऊस अपेक्षित असताना ६६ मिलिमीटर पाऊस कमी पडल्यामुळे शेतकरी दमदार पावसाचे प्रतीक्षेत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या