पिंपळगाव/सडक टोली येथील घटना
ट्रक चालकावर गुन्हा दाखल
कालिदास खोब्रागडे जिल्हा विशेष प्रतिनिधी भंडारा मो.9545914324
भंडारा - समोर जाणाऱ्या ट्रकने अचानक ब्रेक मारल्याने मागे असलेली बोलेरो ट्रकला धडकल्याने इसम गंभीर जखमी झाल्याची घटना पिंपळगाव / सडक पटाची टोली येथे (ता २०) दुपारी ४ वाजता दरम्यान घडली . जखमीचे नाव चंचल उर्फ चेतन पुरुषोत्तम चांदपुरकर (३७) रा. खात रोड, केसलवाडा, तालुका भंडारा असे आहे . लाखनी पोलिसांनी हयगईने व लापरवाहिने ट्रक चालविल्या प्रकरणी ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल केला असून पोलिस निरीक्षक मिलिंद तायडे यांचे मार्गदर्शनात तपास सुरू आहे.
बोलेरो पीकअप गाडी क्रमांक एम एच ३६ ए ए ३१६८ चा चालक परसराम कागदे, गाडी मालक चेतन चांदपुरकर सह येरला (राजनांदगाव ) येथून बोलेरो गाडीने काकरेल कोंबड्या घेऊन येत असताना पिंपळगाव/सडक टोली येथे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वर समोर जाणाऱ्या ट्रक क्रमांक एम एच ३८ डब्ल्यू ०९६७ चे चालकाने आपल्या ताब्यातील ट्रक हयगईने चालवून अचानक ब्रेक मारल्याने बोलेरो ट्रकला धडकली व गाडीचे संतुलन बिघडून गाडी रस्त्याखाली उतरली. त्यात चंचल उर्फ चेतन चांदपुरकर याचे डोके ,चेहरा व हातापायाला गंभीर दुखापत झाली. उपचारासाठी त्याला ग्रामीण रुग्णालय लाखनी येथे नेले असता कर्तव्यावरील वैद्यकीय अधिकारी यांच्या अहवालावरून तथा चालक परसराम कागदे याचे फिर्यादीवरून लाखनी पोलिसांनी ट्रक चालकाविरुद्ध अपराध क्रमांक ३१५/२०२३ कलम २७९,३३८ भादवी तथा मोटार वाहन कायदा सहकलम १८४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस निरीक्षक मिलिंद तायडे यांचे मार्गदर्शनात पोलिस हवालदार निलेश रामटेके तपास करीत आहेत.


0 टिप्पण्या