काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंच्या नेतृत्वात काढणार मोर्चा
भवन लिल्हारे कार्य. संपादक ( चित्रा न्युज महाराष्ट्र राज्य ) मो.नं.9373472847
भंडारा : जिल्ह्यातील शेतकर्यांनी अंगमेहनतीने रब्बी हंगामात उन्हाळी धानाचे उत्पादन घेऊन जवळच्या आधारभूत धान खरेदी केंद्रांवर विक्री केला. मात्र दोन-अडीच महिने लोटूनही बहुतांश शेतकर्यांना उन्हाळी धानाचे चुकारे अदा करण्यात आले नाही. शेतकर्यांचे उन्हाळी धानाचे चुकारे अडल्याने ऐन खरीप हंगामात शेतकरी आर्थिक दृष्ट्या हतबल होऊन शेती कशी करावी, या मानसिकतेत सापडला आहे. शासनाने शेतकर्यांच्या रब्बी धानाचे चुकारे तत्काळ करावे, अन्यथा कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली दि. २० ऑगस्ट रोजी काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात येईल, असा सज्जड ईशारा जिल्हा काँग्रेसच्या वतीने देण्यात आला आहे.
गतवर्षीच्या रब्बी हंगामात मोठ्या प्रमाणात उन्हाळी धानाची लागवड शेतकर्यांनी केली होती. उत्पादीत माल जवळच्या शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्रांवर विक्री केला. मात्र धान विक्री करुनही दि. १५ जून नंतरचे धान चुकार्याची रक्कम शेतकर्यांच्या खात्यात जमा झाली नाही. ऐन खरीप हंगामात शेतकर्यांजवळ पैसा नाही. पैश्याची चणचण असल्याने शेती करायची कशी, या मानसिकतेत सापडला आहे. शेतीला लागणारा मजुरी, खत, मशागत खर्च, औषधी व इतर खर्च करायचा कसा, या मानसिकतेत सापडून शेतकरी आर्थिक दृष्ट्या हतबल झाला आहे. शेतकरी शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणामुळे आर्थिक अडचणीत सापडला आहे.
तसेच यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत घरकूल मंजूर होऊनही घरकूल लाभार्थ्यांना निधीचे वाटप करण्यात आले नाही. निधी अभावी शेकडो घरकूल लाभार्थी बांधकामाच्या प्रतिक्षेत आहेत. जिल्ह्यात जवळपास चार-साडेचार हजार घरकूल मंजूर असून अद्यापही निधीचे वाटप करण्यात आले नसल्याने निधीअभावी घरकुलाचे बांधकाम रखडले आहे. शासनाने नियमित कर्जफेड करणार्या शेतकर्यांना ५० हजार रुपये प्रोत्साहन राशी देण्याची घोषणा केली होती. बहुतांश शेतकर्यांच्या खात्यात प्रोत्साहन राशी अद्यापही जमा करण्यात आले नाही. त्यामुळे नियमित कर्जफेड करणारे अनेक शेतकरी शासनाच्या प्रोत्साहन राशीपासून अद्यापही वंचित आहेत. शासनाने वंचित असलेल्या शेतकर्यांच्या खात्यात ५० हजारांची प्रोत्साहन राशी तत्काळ जमा करावी, अन्यथा विविध मागण्यांसंदर्भात दि. २० ऑगस्ट रोजी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात येणार आहे. अशी माहिती भंडारा जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष मोहन पंचभाई यांनी दिली आहे.
0 टिप्पण्या