चित्रा न्युज प्रतिनिधी
सांगली: सैनिकांनी बजावलेली देश सेवा व कर्तव्याप्रती आदर राखून त्यांच्या ऋणातून उतराई होण्यासाठी ध्वजदिन निधी संकलनामध्ये नागरिकांनी सढळ हस्ते मदत करावी. शासकीय कार्यालयांनी त्यांना दिलेले उद्दिष्ट शंभर टक्के पूर्ण करावे, असे आवाहन जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी आज येथे केले.
ध्वजदिन निधी संकलन 2023 च्या शुभारंभप्रसंगी त्या बोलत होत्या. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन समिती सभागृहात झालेल्या या कार्यक्रमास निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती पाटील, उपजिल्हाधिकारी अजय पवार, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) राजेसाहेब लोंढे, ग्रुप कॅप्टन श्रीकांत वालवडकर (निवृत्त), जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी डॉ. भिमसेन चवदार (निवृत्त), माजी कॅप्टन सुनिल गोडबोले व विद्याधर पोळ, यांच्यासह शासकीय अधिकारी, माजी सैनिक उपस्थित होते.
वीर जवानांना अभिवादन व उपस्थितांना ध्वज दिनाच्या शुभेच्छा देऊन मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी, देशाच्या सीमेवर भारतीय प्रजासत्ताकाची सुरक्षा करीत सैनिकांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त केली. सैनिकांच्या कुटुंबांच्या कल्याणासाठी ध्वज दिन निधी संकलन केले जात आहे. यावर्षी सांगली जिल्ह्यास 1 कोटी 42 लाख 29 हजाराचे उद्दिष्ट देण्यात आले असून हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी प्रत्येकाने निधी संकलनात सढळ हाताने मदत करावी, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
श्री. वालवडकर यांनी उपस्थितांना ध्वजदिन निधीचे महत्व व सैनिकी जीवनाची महती अधोरेखीत केली. कोणत्याही ठिकाणी सेवा देण्यासाठी माजी सैनिक तत्पर असल्याने प्रशासनाने त्यांच्या सेवेचा उपयोग करुन घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी डॉ. चवदार यांनी स्वागत करुन प्रास्ताविकात ध्वज दिन निधी संकलनाबाबत माहिती दिली. गतवर्षी सांगली जिल्ह्यास 1 कोटी 42 लाख 29 हजार उद्दिष्ट देण्यात होते. यामध्ये जिल्ह्याने 85.50 टक्के इतके उद्दिष्ट पूर्ण केले असल्याचे सांगून जिल्ह्यात सर्वात जास्त निधी संकलन जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी (प्राथमिक) 25 लाख 19 हजार, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) 14 लाख 17 हजार 205 तसेच जिल्हा परिषद सामान्य प्रशासन विभाग 9 लाख 46 हजार 410 रूपये यांनी केले असल्याचे यावेळी सांगण्यात आले. यावर्षीही जिल्ह्यास 1 कोटी 42 लाख 29 हजार उद्दिष्ट देण्यात आले असून त्याची पूर्तता करण्यासाठी सर्व यंत्रणा व दानशूर व्यक्तीनी मदत करावी, असे आवाहन त्यांनी केले.
ध्वजदिन निधी 2023 संकलन शुभारंभ एनसीसी कॅडेट पथक संचलन करून वीर जवानांना पुष्पचक्र, श्रध्दांजली वाहून व दीप प्रज्वलनाने करण्यात आली.
गतवर्षी ध्वज दिन निधी संकलनामध्ये उल्लेखनीय कामगिरी केलेल्या कार्यालयाच्या कार्यालय प्रमुखांना शाल व श्रीफळ देवून गौरव करण्यात आला. विशेष गौरव प्राप्त माजी सैनिक व त्यांच्या पाल्यांचाही गौरव मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. सूत्रसंचालन सदानंद गाडगीळ यांनी केले. आभार चंद्रशेखर पांगे यांनी मानले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.


0 टिप्पण्या