Ticker

6/recent/ticker-posts

निर्माणाधीन सहापदरिकरण बांधकामावर धुळीचे साम्राज्य



• राष्ट्रीय महामार्ग ५३ सिंगोरी ते कारधा टोलनाका वरील प्रकार 

• प्रदूषणामुळे गावकऱ्यांसह जाणाऱ्या येणाऱ्यांना श्वसनाची समस्या

• कन्स्ट्रक्शन कंपनीकडून उपाययोजनांची गरज 

कालिदास खोब्रागडे जिल्हा विशेष प्रतिनिधी मो. 95459 14324

भंडारा :- राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने मंजूर केलेल्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३(जुना ६) वरील सिंगोरी ते मुजबी(भंडारा बायपास) निर्माणाधीन सहा पदरिकरणाचे बांधकाम करणाऱ्या कन्स्ट्रक्शन कंपनीने आवश्यक त्या उपाययोजना केल्या नसल्यामुळे धुळीचे साम्राज्य पसरून पर्यावरण प्रदूषित होत असल्यामुळे गावकऱ्यांसह नियमित आवागमन करणाऱ्यांना श्वसनाचे आजार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे कन्स्ट्रक्शन कंपनीने जनतेच्या आरोग्याशी खेळणे सोडून ठोस उपाययोजना करणे आवश्यक झाले आहे. 
              राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३(जुना ६) चे १० वर्षापूर्वी चौपदरीकरणाचे काम करण्यात आले असले तरी सिंगोरी ते मुजबी(भंडारा बायपास) अंतर १०.३४ किलोमीटर यास अपवाद असल्यामुळे नेहमीच वाहतूक कोंडी होत होती. त्यामुळे वाहन चालकांसह जाणाऱ्या येणाऱ्यांना अकारण त्रास सहन करावा लागत असे. या शिवाय एकेरी वाहतुकीमुळे अपघाताचे प्रमाणात वाढ झाली असल्याने चौपदरीकरणाची मागणी जोर धरू लागली होती. सत्ताधाऱ्यांसह विरोधी पक्षाचे कार्यकर्त्यांच्या मागणी वरून केंद्रीय राजमार्ग व बंदरे विकास मंत्री नितीन गडकरी यांनी आर्थिक वर्ष २०२१-२२ मध्ये सिंगोरी ते मुजबी(भंडारा बायपास) सहा पदरीकरण रस्ता अंदाजपत्रकिय रक्कम ७०० कोटी रुपयाचे बांधकामास मंजुरी प्रदान करण्यात आली. 
               ई-निविदा पद्धतीने स्वामी समर्थ इंजिनिअरिंग लिमिटेड ह्या कन्स्ट्रक्शन कंपनीस बांधकामाचे कंत्राट देण्यात आले. ६ पदरी रस्ता, आवश्यक त्या ठिकाणी सिडी वर्क, महामार्गालगत सांडपाणी वाहून जाणारी नाली, वैनगंगा नदीवर पुल, आवश्यक त्या ठिकाणी उड्डाण पूल, डांबरीकरण व सिमेंटिकरण असे बांधकामाचे स्वरूप आहे. मागील वर्षभरापासून सहा पदरीकरणाचे काम सुरू आहे. सिंगोरी ते कारधा टोलनाका दरम्यान महामार्गावर राख, माती व मुरुमाचा वापर केला जात असल्यामुळे नेहमीच धुळीचे साम्राज्य असते. या प्रकाराने पर्यावरण प्रदूषित होत असून गावकऱ्यांसह नेहमी जाणाऱ्या येणाऱ्या वाहन चालकांना श्वसनाचे विकार होण्याचा धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यावर मात करण्यासाठी स्वामी समर्थ इंजिनिअरिंग लिमिटेड ह्या कन्स्ट्रक्शन कंपनीने निर्माणाधीन सहा पदरीकरणावर उपाययोजना करणे गरजेचे झाले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या