Ticker

6/recent/ticker-posts

• जन सुविधा केंद्र मानेगाव/सडक ते पिंपळगाव दरम्यान चा प्रकार

राष्ट्रीय महामार्गावर अवजड वाहतुकीची कोंडी, जनतेला अकारण त्रास

 
• प्रशासन निद्रिस्त

कालिदास खोब्रागडे जिल्हा विशेष प्रतिनिधी मो. 95459 14324


भंडारा :- लाखनी येथील उड्डाण पुलातील तांत्रिक दोष निवारण सुरू असल्यामुळे वाहतूक पुलाखालून सुरू आहे. जिल्हा प्रशासनाच्या आदेशान्वये साकोली ते नागपूर कडे जाणारी अवजड वाहतूक लाखनी-केसलवाडा/वाघ-अड्याळ-पवनी मार्गे वळविण्यात आली आहे. त्यामुळे  जन सुविधा केंद्र ते मानेगाव/सडक व पिंपळगाव दरम्यान वाहतूक कोंडी नित्याचीच बाब झाली असली तरी प्रशासन मात्र याकडे दुर्लक्ष करीत असल्याने आवागमन करणाऱ्यांना कमालीचा त्रास सहन करावा लागतो. याकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे झाले आहे. 
           राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३(जुना ६) चे चौपदरीकरण झाल्याने सुसाट वेगाने वाहने आवागमन करीत असल्याने अनेक अपघात झाले. त्यात काहींना आपला जीव गमवावा लागला. तर काहींना कायमचे अपंगत्व आले. यावर मात करण्यासाठी लाखनी शहरातून उड्डाण पुलाची मागणी जोर धरू लागली. शहर वासियांच्या मागणीचा आदर करून तत्कालीन आमदार राजेश(बाळा) काशिवार यांचे प्रयत्नाने महामार्ग व बंदरे विकास मंत्री नितीन गडकरी यांनी केसलवाडा/वाघ फाटा ते स्मशानभूमी लाखनी पर्यंत अंदाजे अडीच किलोमीटर उड्डाण पुलाचे बांधकामास मंजुरी प्रदान केली. ई-निविदा पद्धतीने बांधकामाचे कंत्राट जेएमसी कंपनीला देण्यात आले. जेएमसी कंपनीने मुदतीत उड्डाण पुलाचे बांधकाम पूर्ण केले. लोकार्पणानंतर उड्डाण पुलावरून वाहतूक सुरू करण्यात आली. पण काही दिवसांनी उड्डाण पुलावरून अवजड वाहने जाताच कर्णकर्कश आवाज येणे सुरू झाले. तसेच २ पिल्लर मधील गॅप वाढल्याचे काही ठिकाणी निदर्शनास आल्याने तांत्रिक दोष निवारणार्थ मागील १५ दिवसापासून उड्डाण पुलावरून वाहतूक बंद असून पुलाखालून सुरू आहे. 
             शिंगोरी-टोलनाका कारधा ते शहापुर पर्यंत सहा पदरिकरणाचे महामार्गाचे काम सुरू असल्यामुळे दररोज वाहतूक कोंडी होत असे. नागरिकांच्या सोयीचा विचार करून तसेच वाहन चालकांचा अकारण वेळ वाया जाऊ नये. याकरिता पोलिस प्रशासनाचे अहवालावरून जिल्हाधिकारी भंडारा यांनी साकोली ते नागपूर मार्गावरील अवजड वाहतूक लाखनी-केसलवाडा/वाघ-अड्याळ-पवनी मार्गे नागपूर कडे वळविण्यात आल्याने केसलवाडा/वाघ फाटा ते लाखनी व जन सुविधा केंद मानेगाव/सडक ते पिंपळगाव पर्यंत शेकडो अवजड वाहने महामार्गावर उभी ठेवून वाहतूक कोंडी होत असते. त्यामुळे नागरिकांना अकारण कमालीचा त्रास सहन करावा लागतो. उड्डाण पुलावर जाण्यासाठी खालच्या रस्त्याने जाणारी अवजड वाहने विरुद्ध दिशेने येऊन भरधाव वेगाने जातात त्यामुळे अपघाताची शक्यता असते. यावर प्रशासनाने दखल घेऊन वाहतूक कोंडी होऊ नये. या करिता आवश्यक त्या उपाययोजना करणे गरजेचे झाले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या