Ticker

6/recent/ticker-posts

अखिल भारतीय ग्राहक पंचायत भंडाराच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली



अखिल भारतीय ग्राहक पंचायत भंडाराच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली 

        अनुराधा पंडे

अखेरचा हा तुला दंडवत…….!!!

                     खरंच काकू, तुम्हास इतक्या लवकर निरोप देण्याची वेळ येईल; असे स्वप्नातही कधी वाटले नाही….??? दिनांक 29 मार्च रोजी सकाळी नऊ वाजता जेव्हा मी आपल्या पायावर अखेरचे डोके ठेवले, तेव्हा पाय तेच होते….पण ओठ मात्र बंद होते. "सदा सुखी रहा, यशस्वी हो, खूप प्रगती कर, आनंदी राहा," असे शब्द मात्र हृदयातून ओठावर आलेच नाही.  कारण तुम्ही चिरनिद्रेत होता. सौ. अनुराधा विष्णुपंत पंडे या नावासमोर कै. लिहितांनाही लेखणी धजावत नाही. काकांच्या मांडीवर तुमच्या निर्वाणाची तयारी होताना पाहून मन भरून आलं. इतकं स्वस्थ-शांत कधी याआधी तुम्हाला पाहिलेच नाही. दारात इतके आप्तस्वकीय असताना तुमची ती लगबग नाही की, प्रत्येकाची विचारपूस नाही. साऱ्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहत आहेत. तुमचा चेहरा मात्र शांत गाढ झोपी गेलेला…!! काकांची ओलेती नजर मात्र तुमच्या चेहऱ्यावर खिळलेली. मूक रुदन…. माझी साथ सोडून, आधीच तू गेलीस….? असा सवाल???
 पण- पण कुणाकडेच उत्तर नाही…. जग सोडून जाणे आपल्या हाती नसतेच म्हणा…!! शेवटी काय तर 'पराधीन आहे जगती हा पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा' हेच अंतिम सत्य…….
              नूतन कन्या हायस्कूलच्या तुम्ही माजी शिक्षिका. संस्कृत शिकवण्यात तुमचा हातखंड. नूतन कन्या शाळेतील एन.सी. सी. च्या युनिट चे कर्णधार. तुम्ही शाळेत लावलेले एन.सी.सी.चे रोपटे आजतागायत बाळसे धरून आहे. माझ्या मुलांनाही तुम्ही संस्कृत शिकवलं. त्यामुळेच त्यांना पैकीच्या पैकी मार्क संस्कृतमध्ये घेता आले. तुमच्यात मुळातच असलेल्या धार्मिक वृत्तीने 'श्री चिंतामणी गणेश मंदिरात' महिलांच्या एकत्रीकरणातून अनेक उत्सव मोठ्या उत्साहात साजरे झाले. आज 'श्री सिद्ध चिंतामणी भजन मंडळ' वेलकम कॉलनीत नावारूपाला आले आहे. अखिल भारतीय ग्राहक पंचायत जिल्हा कार्यकारणीत महिला सदस्य म्हणून तुमची नियुक्ती होती. सामाजिक, प्रबोधनात्मक वा धार्मिक कार्यक्रमात पुढाकार घेऊन,आपल्या मितभाषी स्वभावाने सर्वांना एकत्रित जोडण्यात आपला हातखंड होता. प्रवासाची नितांत आवड. सहल मग भजन मंडळीची असो वा ग्राहक पंचायतीची. तुम्ही सर्वांसाठी काहीतरी गोड आणणारचं हे ठरलेलं. कंटाळा कधीच नाही.  पंडे दांपत्य म्हणजे आमच्या ग्राहक पंचायतीचा उत्साह. प्रसन्नतेचा खळाळणारा झराच जणू……!! आम्हा सर्वांचेच ते ऊर्जा स्रोत…..
               'साधी राहणी, उच्च विचारसरणी' हा फक्त सुविचार नाही, तर काकूंच्या जगण्याचा धर्म होता. तसेच 'माणुसकी' ही निव्वळ पुस्तकी संकल्पना नव्हती तर तो त्यांच्यासाठी आयुष्याचाच एक भाग होता. आदल्या दिवशी नातवाच्या मुंजीत उत्साहाने-आनंदाने मिरवणारी आजी लगेच दुसऱ्या दिवशी चिरनिद्रेच्या अधिन होते….. चेहऱ्यावर समाधानाचे तृप्ततेचे भाव घेऊन…..!! खंत एकच. मुलगी सोनलचा त्याच दिवशी वाढदिवस असल्याने तिला 'औक्षण' करायचे मात्र राहून जाते…... मुलगा-सून-नातवंड, मुलगी-जावई, बहीण-भाऊ, व्याही-विहीणबाई या साऱ्या स्वजनांच्या गोतावळ्यात वयाच्या ७२व्या वर्षी समाधानाने तुम्ही निरोप घेतला. 'मृत्यू हेच अंतिम सत्य आहे', 'शरीर नश्वर आहे' हे खरंच आहे, पण पचवायचं कसं……???
आठविता सहवासा आपला
पापणी ओलावते….. 
अचानक सोडून जाता
मनही हे द्रवते……
कधीच भेट नाही आता
सल ही ऊरी सलते…..
शरीर नसले तरीही 
स्मृतिगंध आठवणींचा दरवळते….. 
काकुंच्या पवित्र आत्म्यास चिरंतन शांतता लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना…….


सौ. जयश्री संजय सातोकर
प्रगती कॉलोनी, भंडारा

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या