Ticker

6/recent/ticker-posts

एकाच गावातील दोन तरुण एमपीएससी परीक्षेचे मानकरी


साकोली:- रवि भोंगाने 

' गाव लहान पण लोकं महान ' असे म्हणायचे भाग्य फार कमी गावातील लोकांच्या वाट्याला येते. आपल्या जिद्दीच्या, परिश्रमाच्या, अभ्यासाच्या भरवशावर आपण काय करू शकतो याचे उदाहरण खंडाळा ( बोंडे ) या गावाने दिलेले आहे. नवीन पिढीतील दोन तरुण युवकांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फत घेतल्या गेलेल्या अर्थात ( एमपीएससी ) राज्यसेवा परीक्षेत यश संपादन केले. एकाच गावातील दोन तरुणांनी एमपीएससी परीक्षेत यश मिळवल्याने या गावाने लौकिक तर प्राप्त केलेच पण एकाच गावातील दोन तरुणांनी एमपीएससी परीक्षेत यश मिळविल्याने तालुक्यातील हे प्रथम गाव ठरलेले आहे.
या दोन तरुणांची नावे आहेत किशोर जयवंत पर्वते आणि ओंकार देवेंद्र लांजेवार. साकोली वरून अवघ्या ७ किलोमीटर अंतरावर असलेले खंडाळा( बोंडे)  हे छोटेसे गाव. सावरबंद पश्चिम मार्गे या गावाला जावे लागते ज्याचे अंतर केवळ ३ किलोमीटर आहे. विशेष म्हणजे ज्या दोन तरुण युवकांनी एमपीएससी परीक्षेत यश गाठले ते वडील शिक्षक असलेल्या घराण्यातील आहेत. तसेही खंडाळा या गावाचा उल्लेख समोर आला की तालुक्यातील सर्वाधिक आदर्श परंपरा लाभलेला गणेशोत्सव स्मरणात येतो. गत ८ ते ९ दशकापासून या गावात  गणेशोत्सवाची परंपरा आजही सातत्याने कायम आहे. ज्या गावावर श्री गणेश नायकाचा वरहस्त आहे त्या गावाचे रूप निश्चितपणे वेगळे वाटायला लागते.
या अगोदर या गावातून विविध डॉक्टर, संशोधक, वकील, आर्मी, कलावंत, शिक्षक, उच्च विद्या विभूषित प्राध्यापक अशा अनेक पिढ्या या गावाने समाजाला, राष्ट्राला अर्पण केल्यात. त्यामुळे या गावाचे लौकिक काय होते आणि आहे हे नव्याने सांगण्याची गरज नाही. परंतु या दोन तरुणांनी एमपीएससीच्या परीक्षेत यश संपादन करून गावाला, तालुक्याला नव्या पिढीच्या रुपात मोठेपणा मिळवून दिला. किशोर जयवंत पर्वते हे सध्या पोलीस निरीक्षक म्हणून नागपूर येथे कार्यरत आहेत तर ओंकार देवेंद्र लांजेवार हे अन्नसुरक्षा अधिकारी म्हणून गोंदिया येथे कार्यरत आहेत. किशोर यांचे वडील जयवंत आई शिशुकला ( गृहिणी ) पर्वते जिल्हा परिषद शाळेतून तर ओंकार यांचे वडील देवेंद्र आई शारदा ( गृहिणी ) लांजेवार हे टिळक विद्यालय खंडाळा येथून सेवानिवृत्त झालेत. दोन्ही शिक्षकाच्या मुलांनी या यशाला गवसणी घातल्याने शिक्षकांची मुले कुठेही मागे नाहीत हे या निमित्ताने पुन्हा एकदा सिद्ध झालेली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या