जालना लोकसभा मतदारसंघात 13 मे रोजी मतदान
मतदानासाठी 12 प्रकारचे ओळखीचे पुरावे ग्राह्य
लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी मतदान अवश्य करा
– जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ
संघदीप मेश्राम चित्रा न्युज
जालना– जालना लोकसभा मतदारसंघासाठी सोमवार, दि. 13 मे रोजी सकाळी 7 ते सायंकाळी 6 या वेळेत मतदान होणार आहे. मतदान करण्यासाठी भारत निवडणूक आयोगाने मतदार छायाचित्र ओळखपत्राव्यतिरिक्त इतर 12 प्रकारचे ओळखीचे पुरावे ग्राह्य धरले आहेत. त्यापैकी कोणताही एक पुरावा दाखविल्यानंतर संबंधितांना मतदान करता येणार आहे.
लोकशाहीच्या या उत्सवात सर्व मतदारांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन कुठल्याही दबाव व प्रलोभनाला बळी न पडता निर्भयपणे 13 मे रोजी मतदान अवश्य करावे. विशेषत: नवमतदारांनी आवर्जुन मतदान करावे. आपली लोकशाही बळकट करण्यासाठी मतदानाला जाणं हे आपल राष्ट्रीय कर्तव्य आहे, त्यामुळे जास्तीतजास्त मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी केले आहे.
भारत निवडणूक आयोगाच्या आदेशान्वये लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी ज्या मतदारांकडे छायाचित्रासह मतदार ओळखपत्र आहे, ते मतदार मतदान केंद्रावर त्यांची ओळख पटविण्यासाठी छायाचित्रासह मतदार ओळखपत्र सादर करतील. जे मतदार छायाचित्रासह मतदार ओळखपत्र सादर करू शकणार नाहीत, अशा मतदारांची ओळख पटविण्यासाठी मतदार ओळखपत्रा व्यतिरिक्त कोणताही एक पुरावा ग्राह्य धरण्यात येणार आहे.
मतदानावेळी मतदारांना दिलेले निवडणूक ओळखपत्र याशिवाय या पुराव्यांमध्ये पारपत्र (पासपोर्ट), वाहन चालक परवाना (ड्रायव्हिंग लायसन्स), केंद्र अथवा राज्य शासन, तसेच सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम, पब्लिक लिमिटेड कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना वितरित केलेले छायाचित्र ओळखपत्र, बँक किंवा टपाल विभागातर्फे छायाचित्रासह वितरित करण्यात आलेले पासबुक, पॅन कार्ड, राष्ट्रीय लोकसंख्या नोंदवही अंतर्गत भारतीय महानिबंधक आणि जनगणना आयुक्तांनी जारी केलेले स्मार्ट कार्ड, मनरेगा अंतर्गत निर्गमित करण्यात आलेले रोजगार ओळखपत्र, निवृत्तीवेतनाची दस्तावेज, संसद, विधानसभा, विधानपरिषदेच्या सदस्यांना वितरित केलेले अधिकृत ओळखपत्र, आधार कार्ड, भारत सरकारच्या सामाजिक न्याय व सशक्तिकरण मंत्रालयाच्यावतीने दिव्यांग व्यक्तींना वितरित केलेले विशेष ओळखपत्र, कामगार मंत्रालयाद्वारा वितरित आरोग्य विमा स्मार्ट कार्ड हे 12 पुरावे मतदानासाठी ग्राह्य धरली जाणार आहेत. प्रवासी भारतीयांना त्यांची ओळख पटविण्यासाठी त्यांचा मूळ पासपोर्ट आवश्यक असणार आहे. मतदारांनी मतदान केंद्रावर जाताना माहिती- चिठ्ठी आणि छायाचित्र ओळखपत्रासोबत घेऊन यावे, असे आवाहन जिल्हा निवडणूक प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
---


0 टिप्पण्या