Ticker

6/recent/ticker-posts

ड्रग्स, गुटख्यासह ७७ लाखांची दारू जप्त; आचारसंहिता काळात जिल्ह्यात विविध कारवाया


रुपाली डोंगरे चित्रा न्युज 
छत्रपती संभाजीनगर :-लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी आता अंतिम टप्प्यात येत आहे. १६ मार्चपासून आचारसंहिता लागू झाली आहे. तेव्हापासून जिल्ह्यात २४ लाख रुपयांची दारु, ५३ लाखाचा गुटखा तर १६ हजार रुपयाचे ड्रग्स असा तब्बल ७७ लाख ६४ हजार ४५७ रुपयांचा ऐवज जप्त केला आहेत. यासोबतच शस्त्रांबाबत कारवाई करताना २ गावठी पिस्तुले, २२ तलवारी, १८ चाकू आणि चार काडतुसे जप्त करण्यात आले असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर यांनी दिली. 
निवडणुकी दरम्यान आदर्श आचारसंहिता सुरु असते. या काळात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये. तसेच मतदारांना आमिष किंवा धमकी देणे यासारखे प्रकार घडत असतात. त्यासाठी शस्त्र, अंमली पदार्थ यांची वाहतूक होते. त्यावर अंकुश ठेवण्यासाठी विविध भागात रस्त्यावर वाहनांची तपासणी केली जाते. याबाबत १६ मार्च ते आतापर्यंतच्या जवळपास दोन महिन्यांत अनेक कारवाया झाल्या. या कारवाईमध्ये पथकाने शहर व ग्रामीण भागातून २७ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यात शहर हद्दीत सर्वाधिक ४० लाख ८० हजार ७५९ रुपयांचा २ हजार ०३७ किलो गुटखा जप्त करण्यात आला आहे. ग्रामीणमध्ये १२ लाख २० हजार ६२१ रुपयांचा २६४ किलो गुटख्यावर कारवाई करण्यात आली. दारूच्या बाबतीत ग्रामीण भागात सर्वाधिक १५ लाख ३७ हजार १०५ किंमतीची ९ हजार ९०७ लिटर तर शहर हद्दीत ९ लाख ९ हजार ३९७ रुपये किंमतीची २ हजार १३९ लिटर दारूवर जप्त करण्यात आली. विशेष म्हणजे शहर हद्दीत १६ हजारांचे ८९५ ग्रॅम ड्रग्स देखील जप्त करण्यात आले आहे. 

दरम्यान, गेल्या दोन महिन्यात प्रशासनाने तब्बल ७७ लाखांचा मुद्देमाल जप्त केला. तरीदेखील प्रशासनाची खरी कसोटी येणाऱ्या सात दिवसांत लागणार आहे. मतदानाची तारीख जशी अधिक जवळ येत जाईल. तसे मतदारांना जवळ करण्यासाठी विविध पद्धतींचा अवलंब केला जातो. त्यामुळे येत्या सात दिवसात प्रशासनावर या सर्व बाबींवर अंकुश ठेवण्याचे मोठे आव्हान समोर असणार आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या