Ticker

6/recent/ticker-posts

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात अकरावीच्या ४४४ महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी ७२ हजार जागा

संघदीप मेश्राम चित्रा न्युज 
छत्रपती संभाजीनगर :-दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर अकरावीच्या प्रवेशाची धावपळ सुरू झाली आहे. छत्रपती संभाजीनगर शहरासह जिल्ह्यातील ४४४ उच्च माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये तिन्ही शाखांना तब्बल ७२ हजार ८६० जागा उपलब्ध आहेत.

त्यात शहरातील ११९ उच्च माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयांचा समावेश असून, खासगी शिकवणी लागण्यासाठी विद्यार्थ्यांचा ओढा ग्रामीण भागाकडेच असल्याचेही समोर आले आहे.

अकरावीच्या प्रवेशासाठी मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक शहरांमध्ये ऑनलाइन पद्धतीने नोंदणी केल्यानंतर केंद्रीय पद्धतीने प्रवेश देण्यात येत आहे. या प्रक्रियेमध्ये छत्रपती संभाजीनगर शहराचाही समावेश होता. मात्र, उपलब्ध असलेल्या जागांएवढीही नोंदणी ऑनलाइन पद्धतीने होत नव्हती. त्यामुळे ही प्रक्रिया बंद केलेली आहे. त्यानंतर आता प्रत्यक्ष महाविद्यालय पातळीवरच प्रवेश करण्यात येतात. दहावीचा निकाल २७ मे रोजी लागल्यानंतर दुसऱ्याच दिवशी अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. जून अखेरपर्यंत प्रवेश प्रक्रिया चालणार असून, जुलैमध्ये नियमित तासिकांना सुरुवात होईल. जिल्ह्यात अकरावीच्या तिन्ही शाखांच्या ७२ हजार ८४० जागा उपलब्ध आहेत. त्याचवेळी दहावीच्या परीक्षेत जिल्ह्यातून ६२ हजार ८५६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यामुळे अकरावी प्रवेशाच्या १० हजार जागा शिल्लक राहणार आहेत. त्यातच दहावीनंतर पॉलटेक्निक, आयटीआयलाही शेकडो विद्यार्थी प्रवेश घेतात. 

महाविद्यालयाच्या पातळीवरच प्रवेश प्रक्रिया

शहरासह जिल्ह्यातील उच्च माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयातील प्रवेशांना सुरुवात झालेली आहे. महाविद्यालयाच्या पातळीवरच ही प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. त्याठिकाणीच नियमानुसार विद्यार्थ्यांना प्रवेश मिळतील. सुरुवातीला अनुदानित जागेवर गुणवत्तेनुसार प्रवेश दिले जातील. त्यानंतर विनाअनुदानित जागेवर विद्यार्थ्यांचे प्रवेश होतील.
- अनिल साबळे, शिक्षण उपसंचालक, छत्रपती संभाजीनगर 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या