• खेडेपार मग्रारोहयो कामावरील घटना
कालिदास खोब्रागडे चित्रा न्युज
भंडारा:- महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमीचे कामावर सकाळ पाळीची हजेरी आटोपून तलाव पाळीवरून खाली उतरतांना तोल गेल्याने खाली पडून महिला मजुराचे पायाचे हाड मोडल्याने गंभीर जखमी झाल्याची घटना खेडेपार येथे गुरुवारी(ता.९ मे) सकाळी ८:१५ वाजता दरम्यान घडली. जखमी महिला मजुराचे नाव दर्शना हेमराज मडावी(४०) रा. खेडेपार, तालुका लाखनी असे आहे. तिचेवर भंडारा येथील एका खासगी दवाखान्यात उपचार सुरू आहे. वृत्त लिही पर्यंत पंचायत समितीचे एकाही जबाबदार अधिकाऱ्याने जखमी मजूर महिलेची भेट घेतली नव्हती.
ग्रामीण परिसरातील दारिद्र्य रेषेखालील व गरीब कुटुंबातील एका व्यक्तीस वर्षातून १०० दिवस रोजगार उपलब्ध करण्याचे उदात्त हेतूने महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेची निर्मिती करण्यात आली. सध्या अनेक गावात मजूर प्रधान कामे सुरू आहेत. खेडेपार येथेही मामा तलावातील गाळ काढण्याचे काम सुरू असून त्यावर ९० महिला व पुरुष मजूर कार्यरत आहेत. सदर काम २ पाळीत सुरू असून सकाळ पाळीत ८:०० वाजता हजेरी झाल्यावर मजूर तलावाचे पाळीवरून तलावात उतरत असताना महिला मजूर दर्शना मडावी हीचा तोल गेल्याने खाली पडून पायाचे हाड मोडल्याने गंभीर जखमी झाली. घटनास्थळावर उपस्थित रोजगार सेवक पुरुषोत्तम धरमसारे व मजुरांनी तिला एक खासगी वाहन बोलावून उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय लाखनी येथे नेले. कर्तव्यावरील वैद्यकिय अधिकाऱ्याने जखमीची प्रकृती अत्यवस्थ असल्याने प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी भंडारा येथे पाठविण्यात आले. नातेवाईकांनी जखमीस भंडारा येथील एका खासगी दवाखान्यात भरती केले. आजच(गुरुवारी) पायावर शस्त्रक्रिया होणार असल्याचे विश्वसनीय वृत्त आहे. घटनेची माहिती पंचायत लाखनीचे महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना विभागास देण्यात आली. पण वृत्त लिही पर्यंत कोणत्याही जबाबदार अधिकाऱ्याने जखमी मजुराची भेट घेतली नसल्याचे विश्वसनीय वृत्त आहे. यामुळे मजूर वर्गात संतापाची लाट उसळली आहे.


0 टिप्पण्या