Ticker

6/recent/ticker-posts

कुलर वापरताना काय काळजी घ्याल? जाणून घ्या सोप्या टिप्स!

रुपाली डोंगरे चित्रा न्युज 
नागपूर  :-उन्हाळा सुरू होताच उकाड्यापासून बचाव करण्यासाठी घर, व्यावसायिक दुकाने, कार्यालये व जवळपास प्रत्येक ठिकाणी कुलरचा वापर करण्यात येतो.

कुलरच्या माध्यमातून विजेचा धक्का बसल्यामुळे दरवर्षी अनेक दुर्घटना घडल्याचेही आपण पाहतो. त्या टाळण्यासाठी नागरिकांनी कुलर वापरताना योग्य ती काळजी घेणे महत्त्वाचे आहे. निष्काळजीपणा प्रसंगी जीवघेणाही ठरू शकतो.

त्यामुळे कुलर वापरताना काळजीपूर्वक वापर करावा, असे आवाहन 'महावितरण'च्या वतीने करण्यात येत आहे.  कुलरसाठी नेहमी थी- पिन प्लगचा वापर करावा. कुलरमध्ये पाणी भरण्यापूर्वी कुलरचा वीजपुरवठा बंद करून प्लग काढून ठेवावा, म्हणजे कुलरचा विजेशी काहीही संबंध राहणार नाही. पाणी भरताना ते टाकीच्या खाली सांडून बाजूला जमिनीवर पसरणार नाही, याची खबरदारी घ्यावी.

ओल्या हाताने कुलरला कधीही स्पर्श करू नये. लहान मुलांना नेहमी कुलरपासून सुरक्षित अंतरावर ठेवावे आणि ती कुलरजवळ खेळणार नाहीत, याबाबत दक्षता घ्यावी. कुलरच्या लोखंडी बाह्यभागात वीजप्रवाह उतरू नये यासाठी कुलरचा थेट जमिनीशी संपर्क येईल, अशी व्यवस्था करावी; जेणेकरून कुलरच्या लोखंडी बाह्यभागात वीजप्रवाह उतरल्यास त्याचा धक्का बसणार नाही. कुलरमधील पाण्याचा पंप ५ मिनिटे सुरू आणि १० मिनिटे बंद ठेवणाऱ्या इलेक्ट्रिक सर्किटचा वापर करावा. यामुळे विजेचीही मोठ्या प्रमाणावर बचत शक्य आहे. कुलरबाबत माहिती नसल्यास कनेक्शन बदल करू नये. कुलरची दुरुस्ती चालू अवस्थेत न करता प्लग काढून नंतरच काम करावे. कुलरच्या प्लगला जोडलेली वायर खंडित वा जीर्ण झालेली असल्यास बदलून दुसरी लावण्यात यावी. अनेकदा पाण्याची पातळी खोल गेल्याने पंप सुरू करूनही पाणी खेचले जात नाही व तो पंप एअर लॉक होतो. अशावेळी प्रायमिंग करणे आवश्यक असते. मात्र चालू पंपाचे प्रायमिंग करणे टाळावे. कुलर हलवताना प्लग पिन काढून नंतरच त्याची हालचाल करावी. कुलर पंप अधूनमधून बंद करावा.  

घरामध्ये अर्थ लिकेज सर्किट ब्रेकर बसवून घ्यावे. आपल्या दैनंदिन व्यापातून थोडासा वेळ या उपाययोजनांसाठी दिला तर कुलरमुळे होणारे विद्युत अपघात टळू शकतात. त्यामुळे आजच या उपाययोजनांची अंमलबजावणी करण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या