• परिसरातील नागरिकांच्या सतर्कतेने मोठा अनर्थ टळला
कालिदास खोब्रागडे चित्रा न्युज
भंडारा :- शहरातील बडा बाजार परिसरात असलेल्या हॉटेल बिसेनच्या तिसऱ्या माळ्यावरून प्रचंड प्रमाणात धूर निघत असल्याचे परिसरातील नागरिकांच्या निदर्शनास येताच त्यांनी हॉटेल मालक तथा अग्निशमन विभागाला माहिती दिली. अग्निशमन विभाग तात्काळ दाखल होऊन आगीवर नियंत्रण मिळविल्याने मोठा अनर्थ टळल्याची घटना गुरुवारी(ता.९) सकाळी ५:०० वाजता दरम्यान उघडकीस आली. शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असावी असा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत असला तरी जीवितहानी झाली नाही. पण हॉटेल मालकाचे लक्षावधी रुपयाचे नुकसान झाले आहे.
शहरातील बडा बाजार परिसरात लोकेश कारेमोरे यांचे हॉटेल बिसेन प्रसिद्ध आहे. तिसऱ्या माळ्यावर खारा, मीठा व डालडा साठवून ठेवलेल्या खोलीमधून प्रचंड प्रमाणात धूर बाहेर पडत असल्याचे गुरुवारी पहाटेचे सुमारास नागरिकाचे निदर्शनास आले. मोठ्या प्रमाणात खारा, मसाला यांचे प्लास्टिक पॉकेट बंद कपाटात ठेवण्यात आल्यामुळे आग भडकत असून आगेची तीव्रता बघून तसेच मोठी दुर्घटना घटण्याची शक्यता असल्याचे समजताच परिसरातील नागरिकांनी हॉटेल मालक तथा अग्निशमन विभागास घटनेची माहिती दिली. घटनेचे गांभीर्य ओळखून अग्निशमन दल तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळावर पोहचताच आगीची तीव्रता बघून दुसऱ्या अग्निशमन वाहनालाही बोलावण्यात आले. प्रचंड प्रमाणात धुराचे लोट बाहेर निघत असल्यामुळे उपाययोजना कशी करावी ? असा प्रश्न पडला असतांनाच अग्निशमन विभागातील कर्मचाऱ्यांच्या प्रसंगावधानाने काच फोडून व्हेंटीलेशन करण्यात आले. धुराच्या तिखट वासामुळे काम करणे अवघड झाले असतांनाही अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्तीचे प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळविण्यात यशस्वी ठरल्याचे अग्निशमक अधिकारी समिर गणवीर यांनी सांगितले. याच इमारतीत असलेले ७ एलपीजी गॅस सिलेंडर वेळीच बाहेर काढल्यामुळे जीवितहानी सह मोठा अनर्थ टळला. या भागातील नागरिकांच्या सतर्कतेमुळे अग्निशमन विभागाला तात्काळ सूचना प्राप्त झाल्यामुळे वेळीच योग्य कारवाई केली गेली. शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असावी. असा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत असून भंडारा नगर परिषदेचे मुख्याधिकारी करणकुमार चव्हाण यांचे मार्गदर्शनात नगर अग्निशमन अधिकारी समिर गणवीर यांच्या नेतृत्वात फायरमेन अखिल शेख, सागर गभने, वाहन चालक कृष्णा मसराम, रवींद्रकुमार खंगारे यांनी अथक परिश्रम घेऊन आगीवर नियंत्रण मिळविल्याने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी हॉटेल मालकाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असल्याचे समजते.


0 टिप्पण्या