पंचनामा करुन मतदार ओळखपत्रे घेण्यात आली ताब्यात
अज्ञात व्यक्तीविरुध्द गुन्हा दाखल
दोषी विरुध्द कडक कारवाई केली जाईल – जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ
जालना :- जालना शहरातील अंबड रोडवरील कांचन नगर येथील फोटो स्टुडिओ शेजारी सापडलेली मतदार ओळखपत्र प्रकरणाची मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी, जालना यांनी तात्काळ दखल घेतली. या प्रकरणी महसूल सहायक व तलाठी यांनी सापडलेली 176 मतदार ओळखपत्रे ताब्यात घेऊन पंचनामा केला. ताब्यात घेण्यात आलेल्या मतदार ओळखपत्रांची प्राथमिक पडताळणी करण्यात आली असून ही मतदार ओळखपत्रे जुनी असल्याचे निदर्शनास आले आहे. या प्रकरणात अज्ञात व्यक्तीविरुध्द कदिम जालना पोलीस स्थानकात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
या घटनेबाबत प्रतिक्रिया देताना जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ म्हणाले की, जालना शहरात सापडलेली मतदार ओळखपत्रे जुनी आहेत. ही मतदार ओळखपत्रे अज्ञात व्यक्तीने टाकलेली होती. याबाबत माहिती मिळताच उपविभागीय अधिकारी, जालना यांनी ही मतदार ओळखपत्रे तात्काळ हस्तगत केली असून त्याचा पुढील तपास सुरु आहे. सापडलेले मतदार ओळखपत्रे ज्या व्यक्तींची आहेत, त्या व्यक्तींकडे भारत निवडणूक आयोगाचे नवीन कार्ड आहे का ? याचाही तपास सुरू आहे. कोणत्या व्यक्तीने हे जाणीवपूर्वक कार्ड टाकले आहेत का ? त्याला ती कोठून मिळाली? याबाबतचाही तपास सुरु आहे. या व्यक्तीचा शोध घेऊन त्याच्याविरुध्द योग्य ती कारवाई करण्यात येईल.
सापडलेल्या ओळखपत्रांची नावे बीएलओ मार्फत तपासणीचे काम सुरु करण्यात आलेले आहे, असे मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी, जालना यांनी कळविले आहे.


0 टिप्पण्या