Ticker

6/recent/ticker-posts

मतदान केंद्रांवरील रुक्ष खोल्या झाल्या ‘बाळसेदार’पाळणाघरांसाठी खेळण्या पाळण्यांची सज्जता



रोशन चावरे चित्रा न्युज 
 छत्रपती संभाजीनगर:- आई मतदान करत असेल तेव्हा तिच्या कडेवरील बालकाचा तितकावेळ सांभाळ करण्यासाठी मतदान केंद्रावर पाळणाघरांची सुविधा देण्यात येत आहे. त्यासाठी महिला व बालविकास सज्ज झाला आहे.  या पाळणाघरांसाठी पाळणे, खेळणी, बेबी फुड इ. साहित्य जमा करणे सुरु झाले आहे. एरवी रुक्ष असणाऱ्या या खोल्या या खेळण्यांमुळे ‘बाळसेदार’ झाल्या आहेत. 

 जिल्ह्यात मतदान केंद्रांवर पाळणाघर स्थापित करण्यात येणार आहे. एकही मतदार मतदानापासून वंचित राहू नये यासाठी निवडणूक यंत्रणा राबत आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दिलीप स्वामी यांनी निर्देश दिल्यानुसार, एखादी माता मतदानासाठी आली असता तितकावेळ तिच्या कडेवरील बाळाचा चांगल्या पद्धतीने सांभाळ होणे अपेक्षित आहे. किंवा मतदार लहान मुलासह मतदानाला आल्यास त्या मतदाराला मतदान करण्यासाठी जितका वेळ लागेल तितका वेळ त्या बाळाला सांभाळण्यासाठी मतदान केंद्रांवर ही पाळणा घर सुविधा देण्यामागचा विचार आहे.  त्यासाठी प्रत्येक पाळणाघर एका अंगणवाडी ताईंकडे सोपविले जाणार आहे. या ठिकाणी येणाऱ्या बालकाला तिथं अनेक खेळणी, झोपाळ्यात असलेल्या बालकांसाठी प्रत्यक्ष पाळणे जमा केले जात आहेत. हे पाळणे व खेळणे त्या त्या गावातील लोकांकडून जमा करण्यात आली आहे. याशिवाय बालकांना प्यायचे पाणी, बेबी फुड आदींची सज्जता ठेवण्यात आली आहे, असे जिल्हा महिला व बालविकास अधिकारी सुवर्णा जाधव यांनी सांगितले. 

 श्रीमती जाधव यांनी माहिती दिली की, जिल्ह्यात शहरी भागात १८० तर ग्रामिण भागात  १६५० पाळणाघरे तयार करण्यात येत आहेत. ज्या इमारतीत अनेक मतदान केंद्र असतील तेथे त्या इमारतीत एक पाळणा घर असेल. प्रत्येक पाळणाघरावर एक याप्रमाणे अंगणवाडी ताईंची नियुक्ती आहे. मतदान केंद्र ज्या इमारतीत आहे तेथील नियोजित पाळणा घराच्या खोलीत हे साहित्य जमा करण्यात आले आहे. या बालकांच्या खेळणे इ. साहित्यामुळे या एरवी रुक्ष असणाऱ्या खोल्या बाळसं धरु लागल्या आहेत. आता गरज आहे ती बालकांच्या किलबिलाटाची. म्हणजेच मातांनी करावयाच्या मतदानाची.

(छायाचित्रात खांडवी पिंपळगाव टाकळी बिट गंगापूर-१ , गंगापूर तालुका. खडकनारळा-जांभाळा बीट पळसवाडी येथील मतदान केंद्रावरील नियोजित पाळणाघर)

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या