Ticker

6/recent/ticker-posts

गट क्रमांक ५३/२ मधील भूखंडाचे एकत्रीकरण योग्य की अयोग्य ?

• गडेगाव येथील प्रकार 

 कालिदास खोब्रागडे चित्रा न्युज
 भंडारा:- लाखनी येथिल स्थानिक स्वराज्य संस्था गडेगाव चे हद्दीतील गट क्रमांक ५३/२ मधील प्लॉट क्रमांक  ६, ७, ८, ९ आणि १३, १४, १५, १६ चे मध्यभागातून २० फुटाचा सार्वजनिक रस्ता असून सदर प्लॉट सुखदेव उर्फ राजेश मस्के आणि नातेवाईकांचे मालकीचे होते. सदर प्लॉट उपविभागीय अधिकारी साकोली यांचे आदेशान्वये २ फेब्रुवारी २०२४ रोजी  एकत्रीकरण करण्यात आले. तलाठी गडेगाव यांनी फेरफार क्रमांक ३९९४ दिनांक १५ मार्च २०२४ अन्वये फेरफारही घेतला. सदर प्लॉट चे मध्य भागातून सार्वजनिक रस्ता असल्यामुळे मालकी ग्रामपंचायतीची आहे. रस्त्यासहित प्लॉट चे एकत्रीकरण करण्यात आले काय ? असल्यास ग्रामपंचायतीने नाहरकत प्रमाणपत्र दिले होते काय ? दिले असल्यास सार्वजनिक उपयोगाची जागा वयक्तिक कशी देण्यात आली ? असा प्रश्न निर्माण होत असून त्या प्लॉट चे एकत्रीकरण योग्य की अयोग्य ? हा वादाचा विषय झाला आहे.  
                गडेगाव ग्रामपंचायतीचे हद्दीतील अशोक लेलँड समोर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३(जुना ६) लगत असलेला गट क्रमांक ५३/२ निवासी प्रयोजनार्थ तहसीलदार लाखनी यांचे आदेश रा.मा.क्र. ०१/एनएपी.३४/२०१२-१३ दिनांक २९ जून २०१३ नुसार अकृषक करण्यात आला असून यातील प्लॉट क्रमांक ६, ७, ८, ९ आणि १३, १४, १५, १६ असे एकूण ८ प्लॉट सुखदेव उर्फ राजेश मस्के आणि नातेवाईकांनी २०१८-१९ मध्ये विकत घेतले. नियमानुसार निवासी प्रयोजनार्थ शेत जमीन अकृषक केल्यास वर्षभरात वापर केला नाही तर अकृषक परवानगी आपोआपच रद्द होते. असा नियम असला तरी या लेआऊट मध्ये नियमास तिलांजली देण्यात आली. सदर भूखंड महामार्गालगत असल्यामुळे यात निवासी घरांचे बांधकाम झाले नाही. ही बाब महसूल अधिकाऱ्यांनाही माहीत होती. लेआऊट मधील भूखंड निवासी प्रयोजना व्यतिरिक्त व्यवसायासाठी उपयोग करावयाचा असल्यास स्थानिक महसूल प्रशासनाची वाणीज्यिक(कमर्शिअल) परवानगी घेणे आवश्यक असले तरी सुखदेव उर्फ राजेश मस्के यांनी घेतली नाही. तथा नियमबाह्य दुकान गाळ्याचे बांधकाम केले असल्याचे विश्वसनीय वृत्त आहे.
                या शिवाय सुखदेव उर्फ राजेश मस्के याने या प्लॉट वर दुकान गाळ्या व्यतिरिक्त इतरही बांधकाम केले. तसेच सरकारी गट क्रमांक ५८/१ मध्ये अतिक्रमण करून स्विमिंग टँक व इतर बांधकाम केल्याचे स्थानिक स्वराज्य संस्था व तलाठी आणि मंडळ अधिकारी यांनाही माहीत असताना कारवाईचे सौजन्य दाखविले नाही. या बाबद वर्तमानपत्रात अनेकदा वृत्त प्रकाशित होऊनही तहसीलदार लाखनी यांनी कसलीही कारवाई केली नाही. प्रकरण आपणावर शकणार ह्या भीतीपोटी सुखदेव उर्फ राजेश मस्के यांनी उपविभागीय महसूल अधिकारी साकोली यांचेकडे प्लॉट क्रमांक ६, ७, ८, ९ आणि १३, १४, १५, १६ यांचे एकत्रीकरणासाठी प्रस्ताव दाखल केला होता. उपविभागीय अधिकारी साकोली यांचे आदेश क्रमांक रा.मा.क्र.०२/एसआरव्ही ४३/२०२३-२४ दिनांक २ फेब्रुवारी २०२४ नुसार एकत्रीकरण करण्यात आले असून गट क्रमांक ५३/२/१६ आराजी १७.६६०५ चौरस मीटर करण्यात आली आहे. 
                 उपविभागीय महसूल अधिकारी यांचे आदेशान्वये तलाठी साझा क्रमांक २ गडेगाव यांनी फेरफार क्रमांक ३९९४ दिनांक १५ मार्च २०२४ नुसार मंडळ अधिकारी लाखनी यांचेकडून फेरफारही मंजूर केले. प्लॉट क्रमांक ६, ७, ८, ९ आणि १३, १४, १५, १६ ह्या प्लॉट चे मध्यभागातून २० फूट रुंदीचा सार्वजनिक रस्ता असून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मालकीचा आहे. सदर प्लॉट चे रस्ता सोडून एकत्रीकरण केले की रस्ता धरून एकत्रीकरण करण्यात आले. हा संशोधनाचा विषय आहे. जर सार्वजनिक उपयोगाचा रस्ता धरून एकत्रीकरण केले असल्यास ग्रामपंचायतीने नाहरकत प्रमाणपत्र दिले आहे काय ? असा प्रश्न निर्माण होतो. दिले असल्यास ग्रामपंचायतीचे मालकीची जागा गावातील एखाद्या व्यक्तीच्या फायद्यासाठी देता येते का ? हे न समजण्या पलीकडील आहे. यावरून गट क्रमांक ५३/२ मधील भूखंडाचे एकत्रीकरण योग्य की अयोग्य ? अशा चर्चांना पेव फुटले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या