Ticker

6/recent/ticker-posts

विकास कामांचे भूमिपूजन की शिवसेनेचा कार्यकर्ता मेळावा !


कालिदास खोब्रागडे चित्रा न्युज
भंडारा :- येथील विधानसभा क्षेत्राचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांचे प्रयत्नाने विविध विकास कामांसाठी भंडारा विधानसभा क्षेत्रात ५४७ कोटी रुपये निधी उपलब्ध करण्यात आला. जिल्हा प्रशासनाचे वतीने या विकास कामांचे सोमवार(ता.२४जून) रोजी दुपारी १:३० वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तथा पालकमंत्री व उद्योगमंत्र्यांचे हस्ते भूमिपूजन सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्यात जिल्ह्यातील खासदार, आमदारांसह जिल्हा परिषद अध्यक्ष तसेच विभागीय आयुक्त व विशेष पोलिस महानिरीक्षक नागपूर यांना आमंत्रित करण्यात आले होते. पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्थानिक आमदाराशिवाय सर्व निमंत्रित पाहुण्यांनी या सोहळ्याकडे पाठ फिरविली. शासकीय कार्यक्रम असताना मुख्यमंत्र्याचे हस्ते आमदार नरेंद्र भोंडेकर यांचा शिवसेनेत रीतसर प्रवेश केल्याने हा कार्यक्रम विकास कामांचे भूमिपूजन की शिवसेनेचा कार्यकर्ता मेळावा ? अशा खमंग चर्चांना जिल्ह्यात पेव फुटले आहे. 
                       भंडारा विधानसभा क्षेत्राचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी भंडारा व पवनी तालुक्यात विविध विकास कामांसाठी राज्य शासनाकडून ५४७ कोटी रुपये निधी खेचून आणला. त्यात जल पर्यटन केंद्राची निर्मिती प्रथम टप्पा १०२ कोटी, महाराष्ट्र नगरोत्थान अंतर्गत नगर परिषद भंडारा मधील भूमिगत गटार योजना टप्पा २- १३० कोटी, अमृत योजनेअंतर्गत भंडारा आणि पवनी येथील तलाव सौंदर्यकरण- १०३ कोटी, महाराष्ट्र नगरोत्थान अभियान अंतर्गत नगर परिषद भंडारा येथे रस्ते बांधकाम- ७५ कोटी, वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत भंडारा व पवनी नगर परिषद मध्ये विविध विकास कामे- १० कोटी, जिल्हा नियोजन समिती अंतर्गत भंडारा व पवनी नगर परिषद मध्ये विविध विकास कामे- १५ कोटी, जिल्हा क्रीडा संकुल भंडारा येथे विविध सुविधा- ७२ कोटी, सार्वजनिक बांधकाम विभाग भंडारा अंतर्गत खामतलाव ते शास्त्री चौक राज्यमार्ग, भंडारा तुमसर राज्यमार्ग व नागपूर नाका ते राजीव चौक रस्ता सुधारणा करणे- ४० कोटी इत्यादी विकास कामांचा भूमिपूजन सोहळा सोमवारी रेल्वे मैदान माधव नगर खात रोड भंडारा येथे आयोजित करण्यात आला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री विजयकुमार गावित, उद्योगमंत्री उदय सामंत यांचे हस्ते खासदार प्रफुल्ल पटेल, खासदार डॉ. प्रशांत पडोळे, आमदार सुधाकर आडबले, आमदार अभिजित वंजारी, आमदार नाना पटोले, आमदार नरेंद्र भोंडेकर, आमदार राजू कारेमोरे, जि.प. अध्यक्ष गंगाधर जिभकाटे, विभागीय आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी, पोलिस महानिरीक्षक नागपूर परिक्षेत्र छेरिंग दोरजे इत्यादी मान्यवरांना जिल्हा प्रशासनाचे वतीने निमंत्रित करण्यात आले होते. 
                          मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व आमदार नरेंद्र भोंडेकर या व्यतिरिक्त एकही मान्यवर या भूमिपूजन सोहळ्यास उपस्थित राहिले नाही. त्यामुळे जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी समिर कुर्तकोटी, नगर परिषदेचे मुख्याधिकारी करणकुमार चव्हाण, शिवसेनेचे भंडारा जिल्हाध्यक्ष अनिल गायधने, शिवसेना गोंदिया जिल्हाध्यक्ष मुकेश शिवहारे व शिवसेना पदाधिकाऱ्यांचे प्रमुख उपस्थितीत पार पडला. या शासकीय कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी केले. आभासी पद्धतीने विकास कामांचा भूमिपूजन सोहळा पार पडला. आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे हस्ते शिवसेनेत अधिकृत प्रवेश केला. त्यांचा २६ जून रोजी वाढदिवस असल्याने मान्यवरांचे हस्ते ॲडव्हान्स शुभेच्छा देण्यात आल्या. बालकांना शाळेच्या प्रवाहात आणण्यासाठी त्यांचे घरी जाऊन वह्या, नोटबुक वाटप करण्यात येणार असल्याचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी मार्गदर्शन करतांना सांगितले. याशिवाय विधानसभा क्षेत्रात केलेल्या विकास कामांची माहिती दिली. तसेच विरोधकांवर तोंडसुख घेतले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्ह्याला निधी पडू देण्यात नाही. असे उपस्थितांना आश्वासन दिले. पण गोसेखुर्द प्रकल्पग्रस्तांच्या समस्या ऐकून घेतल्या नाही. निमंत्रित मान्यवरांनी या भूमिपूजन सोहळ्यास दांडी मारल्याने नाईलाजाने प्रोटोकॉलास बगल देऊन जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे उपस्थितीत शासकीय कार्यक्रम पार पाडण्यात आल्याने हा शासकीय कार्यक्रम की शिवसेनेचा कार्यकर्ता मेळावा ? अशा चर्चांना जिल्ह्यात उत आला आहे. 
महायुतीत बिघाडीची शक्यता

उपमुख्यमंत्री तथा जलसंधारण मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सहकार्याने भंडारा जिल्ह्यात जल पर्यटन निधी मिळालेला आहे. पण उद्घाटन फलकावरती जाणीवपूर्वक त्यांचे नाव वगळण्यात आल्याने जिल्हाधिकारी व स्थानिक आमदार यांचा भारतीय जनता पक्षाचे भंडारा तालुकाध्यक्ष विनोद बांते यांनी निषेध केला असून या प्रकाराने आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. 

युवक काँग्रेसकडून मुख्यमंत्र्यांना काळे झंडे दाखविले

महाराष्ट्र नगरोत्थान अभियान अंतर्गत नगर परिषद भंडारा मधील भूमिगत गटार योजना टप्पा २ साठी निधी उपलब्ध करण्यात आलेला आहे. पण टप्पा १ चे काम अपूर्ण असून ठिकठिकाणी रस्ते खोदलेले असून माती पडलेली आहे. पावसाळ्याचे दिवस असल्याने चिखल होऊन जाणाऱ्या येणाऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागेल. तसेच मागील दौऱ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेतकऱ्यांना १६ तास वीज देण्याचे आश्वासन दिले होते. पण पूर्तता केली नाही. तसेच नीट पेपर लिक प्रकरणामुळे अभ्यासू व हुशार विद्यार्थ्यांवर अन्याय होणार असल्याने निषेध म्हणून युवक काँग्रेस च्या वतीने मुख्यमंत्र्यांना काळे झंडे दाखविण्यात आले. 

दिग्गजांची अनुपस्थिती

महायुतीचा घटकपक्ष असलेल्या भारतीय जनता पार्टीचे पालकमंत्री व उद्योगमंत्री असून राष्ट्रवादी काँग्रेस(अजित पवार गटाचे) राज्यसभा सदस्य व तुमसर विधानसभा क्षेत्राचे आमदार आहेत. युतीधर्म म्हणून त्यांनी या भूमिपूजन सोहळ्यास उपस्थित राहणे आवश्यक होते. पण दांडी मारल्याने जिल्ह्यात चर्चेचा विषय झाला आहे. 

पत्रकारांची बोट पलटली

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे वैनगंगा नदीत जल पर्यटन करीत असताना त्यांचे चित्रांकन करणाऱ्या नागपूर येथील १० ते १२ पत्रकारांची बोट दगडाला धडकल्याने पलटली. यात कसलीही अप्रिय घटना घडली नसली तरी जिल्ह्यात हा चर्चेचा विषय झाला आहे. 

आमदार भोंडेकर यांचा शिवसेना प्रवेश

भंडारा विधानसभा क्षेत्राचे आमदार नरेंद्र भोंडेकर हे २०१९ चे विधानसभा निवडणुकीत अपक्ष निवडून आले होते. त्यांची विचारधारा शिवसेनेची असल्यामुळे त्यांनी शिवसेना शिंदे गटास समर्थन दिले होते. पण शिवसेनेत अधिकृत प्रवेश केला नव्हता. सोमवारी झालेल्या विविध विकास कामांचे भूमिपूजन सोहळ्याप्रसंगी त्यांनी मुख्यमंत्र्याच्या हस्ते रीतसर शिवसेनेत प्रवेश केला आहे. 



प्रकल्पग्रस्तांच्या समस्यांवर राजकारण

गोसेखुर्द प्रकल्पग्रस्त शेतकरी, शेतमजूर व मच्छीमार कृती समिती नागपूर आणि गोसेखुर्द प्रकल्पग्रस्त हक्क कृती समिती भंडारा तर्फे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भंडारा भेटी दरम्यान गोसेखुर्द प्रकल्पग्रस्तांच्या समस्या व त्यांना होणाऱ्या नुकसानीबाबद निवेदन देण्याकरिता जिल्हाधिकारी भंडारा यांची परवानगी घेतली, पण भेटू दिले गेले नाही. उलट कार्यकर्त्यांनी या बाबद रेल्वे मैदानातील सभेत आवाज बुलंद करताच पोलिसांनी त्यांना पकडून गुन्हेगारासारखे भंडारा पोलिस ठाण्यात नेण्यात आल्याने प्रकल्पग्रस्तांच्या समस्यांशी राजकारण्यांना काही देणे घेणे नाही. उलट राजकारण केले जात आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या