नायलॉन जाळ्यात 3 तास अडकलेल्या बिनविषारी सापाला दिले जीवदान; वन्यजीव रक्षणाचा आदर्श
चित्रा न्युज प्रतिनिधी
लाखनी(श.प्र.) : -माणूस आणि निसर्ग यांच्यातील नातं अजूनही जिवंत आहे, याचा प्रत्यय आज निलागोंदी गावात आला. गावाशेजारील तलावात मासे बाहेर पडू नयेत म्हणून लावण्यात आलेल्या नायलॉन जाळ्यात अडकलेल्या धामण जातीच्या बिनविषारी सापाला गावातील सर्पमित्रांनी वेळेत धाव घेऊन जीवदान दिले.गावाशेजारील तलावात नेहमीच मासे आणि इतर जलचर आढळतात. मासे बाहेर जाऊ नयेत म्हणून काही दिवसांपूर्वी तलावाच्या काठावर नायलॉनचे बारीक जाळे लावण्यात आले होते. मंगळवारी दुपारच्या सुमारास शिकारीच्या शोधात असलेला सुमारे 5 फूट लांबीचा धामण जातीचा साप पाण्यातील मासे पकडण्यासाठी गेला असता तो या जाळ्यात अडकला. जवळपास 3 तास तो तडफडत होता. ही बाब सायंकाळी तलावाकडे गेलेल्या एका ग्रामस्थाच्या लक्षात आली. घटना कळताच गावातील प्राणीमित्र आणि सर्पमित्र देवदास हटवार, शुभम वंजारी आणि प्रथमेश वंजारी यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. जाळ्यातील गुंतागुंत आणि सापाची होणारी तडफड पाहून त्यांनी कोणतीही घाई न करता मोठ्या संयमाने आणि शिताफीने सापाला जाळ्यातून सोडवले.या कामात वैष्णव वंजारी, चेतन वंजारी, सौरभ वंजारी आणि पंकज वंजारी यांनी आवश्यक कटर, काठी आणि पोते असे साहित्य पुरवून मोलाचे सहकार्य केले.जाळ्यातून बाहेर काढल्यानंतर सापाला प्राथमिक उपचार करून काही वेळ निरीक्षणाखाली ठेवण्यात आले. तो पूर्णपणे ठीक असल्याची खात्री पटल्यानंतर त्याला गावापासून दूर असलेल्या जंगलात निसर्गाच्या सानिध्यात सुरक्षितपणे सोडून देण्यात आले.
*गावातून कौतुकाचा वर्षाव*
एका मुक्या जीवाला वाचवण्यासाठी दाखवलेल्या या तत्परतेमुळे गावातून सर्पमित्र टीमचे सर्वत्र कौतुक होत आहे. "आजच्या काळात असे जीव वाचवणारे तरुण दुर्मिळ आहेत" अशा प्रतिक्रिया ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहेत.वन्यजीव तज्ञांच्या मते, धामण हा पूर्णतः बिनविषारी साप आहे. तो शेतातील उंदीर, घुशी खाऊन शेतीचे मोठे नुकसान टाळतो. त्यामुळे त्याला मारणे म्हणजे पर्यायाने आपल्याच पिकाचे नुकसान करणे आहे.निलागोंदीच्या तरुणांनी दाखवलेला हा आदर्श इतर गावांसाठी देखील प्रेरणादायी आहे.


0 टिप्पण्या