राकेश आसोले चित्रा न्युज
नवी मुंबई:- गेल्या रात्रीपासून पावसाची संततधार सुरू आहे. बेलापूर ते दिघा या सर्व आठ विभागात जोरदार पाऊस पडत आहे, त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.
संततधार पावसामुळे नवी मुंबईतील रस्ते पाण्याने भरले आहेत, आणि वाहतूक व्यवस्थेत अडचणी निर्माण झाल्या आहेत. रस्त्यांवर पाणी साचल्यामुळे वाहनचालकांना वाहने चालवताना विशेष काळजी घ्यावी लागत आहे.
पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचल्याने निचरा व्यवस्था ढासळली आहे. नागरिकांना घरातून बाहेर पडणे अवघड झाले असून, काही ठिकाणी वीज पुरवठ्यातही अडचणी निर्माण झाल्या आहेत.
नवी मुंबई महानगरपालिका व आपत्कालीन सेवा यंत्रणांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. विशेषतः नदीकाठच्या व निचाण भागातील रहिवाशांना आवश्यक ती खबरदारी घेण्याचे सांगण्यात आले आहे.
महापालिका प्रशासनाने जलद गतीने निचऱ्याचे काम हाती घेतले असून, पाणी तुंबलेल्या भागातील पाणी काढण्यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत. नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा आणि सुरक्षिततेसाठी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
नवी मुंबईत पुढील काही दिवस पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्यामुळे नागरिकांनी पुढील काही दिवस काळजी घेऊन राहावे.


0 टिप्पण्या