रवी भोंगाने साकोली
साकोली:-हिरामण लांजे म्हणजे विदर्भाच्या साहित्य खाणीत सापडलेला हिरा. म्हणूनच त्यांचे नावही हिरामण असावे. साहित्य क्षितिजावर कोरलेले एक नाव. विदर्भाच्या पलीकडे जाऊन त्यांनी अनेक साहित्य धारेला स्पर्श केला. हाच स्पर्श कालांतराने साहित्य क्षेत्रात त्यांच्यासाठी सोनेरी कळस होऊन गेला. जिज्ञासी वृत्ती, अभ्यासपूर्ण संशोधन, दूरदृष्टीकोन यांची तंतोतंत जाणीव ठेवून त्यांनी सलग जवळपास ७९ वर्षापासून साहित्याची उपासना साधली. ते साहित्य क्षेत्रातले नाव म्हणजे " रमानंद " म्हणजेच हिरामण लांजे. हिरामण लांजे यांचे अभिव्यक्ती, साहित्य आणि समाज या ग्रंथाचा शानदार प्रकाशन सोहळा प्रकाश पर्वावर प्रकाशच्याच साक्षीने पार पडला. या ग्रंथ प्रकाशन सोहळ्याला संपूर्ण साहित्यमय वातावरण निर्माण झाले होते. ज्यांच्या ग्रंथाचे प्रकाशन झाले ते सुप्रसिद्ध साहित्यिक, कवी, लेखक, अभ्यासक, संशोधक हिरामण लांजे यांच्यासह कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून बोली महर्षी डॉ. हरिश्चंद्र बोरकर हे उपस्थित होते. तर ग्रंथ प्रकाशन सोहळ्याचे साक्षीदार म्हणून भंडारा येथील माजी प्राचार्य डॉ. गुरुप्रसाद पाखमोडे, गोंदिया येथील अँड. लखनसिंह कटरे,माजी आमदार डॉ . हेमकृष्ण कपगते, अँड, अण्णा परशूरमकर अशी साहित्यिक मंडळी उपस्थित होती. या सोहळ्याचे संपूर्ण एकमेव आकर्षण म्हणजे हिरामण लांजे यांचा संपूर्ण कौटुंबिक परिवार आणि साहित्य क्षेत्रातील त्यांचा जुना जाणता मित्र परिवारही प्रामुख्याने उपस्थित होता. या भावपूर्ण सोहळ्यात त्यांच्या अभिव्यक्ती, साहित्य आणि समाज या ग्रंथाचे विमोचन नागपूर येथील डॉ. निलकांत कुलसंगे यांच्या हस्ते पार पडले. याप्रसंगी प्रदीप पवार आणि डॉ. जगदीश बारसागडे यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. यावेळी सर्व उपस्थितांची भाषणे झालीत. ग्रंथ प्रकाशन सोहळा कार्यक्रमाचे अध्यक्षीय भाषण करतांना डॉ. हरिश्चंद्र बोरकर यांनी हिरामण लांजे यांच्या ७९ वर्षातील प्रदीर्घ साहित्याचा लेखाजोखा उपस्थितांसमोर ठेवला. संचालन प्रकाश बाळबुध्ये यांनी केले.
0 टिप्पण्या