Ticker

6/recent/ticker-posts

पेसा भरतीच्या नाशिक येथील जन आक्रोश मोर्चात बिरसा फायटर्स सहभागी होणार!


संजय देशमुख चित्रा न्युज
शहादा : पेसा पदभरतीच्या मागणीसाठी दिनांक २८ ऑगस्ट २०२४ रोजी नाशिक येथे आदिवासींचे जन आक्रोश मोर्चाचे आयोजन समस्त आदिवासी समाजाकडून करण्यात आलेले आहे.हा मोर्चा सकाळी ठीक ११ वाजता तपोवन मैदान, औरंगाबाद नाका,निमाणी, मालेगाव स्थानक ,रविवार कारंजा,रेड क्रॉस सिग्नल, शालिमार, सीबीएस ते जिल्हाधिकारी कार्यालय- आदिवासी विकास भवन नाशिक असा काढण्यात येणार आहे.या जन आक्रोश मोर्चात सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असणारी बिरसा फायटर्स ही सामाजिक संघटना सक्रिय सहभागी होणार आहे.अशी माहिती बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा यांनी दिली आहे.दिनांक  १२ ऑगस्ट २०२४ रोजी पेसा भरतीच्या मागणीसाठी नाशिक येथे जिल्हाधिकारी कार्यालय व आदिवासी विकास भवन समोर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले होते,तेव्हाही बिरसा फायटर्सचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने रास्ता रोको आंदोलन सहभागी झाले होते. दिनांक १ ऑगस्ट २०२४ पासून पेसा भरतीच्या मागणीसाठी आदिवासी पात्रताधारक विद्यार्थांनी नाशिक येथील गोल्फ क्लब मैदान मध्ये आमरण उपोषण सुरू केलेले आहे.उपोषणाची दखल घेतली जात नाही,म्हणून माजी आमदार जे.पी.गावित हे स्वतःच आदिवासी विकास भवन नाशिक समोर आमरण उपोषणास बसले आहेत.माजी आमदार जे.पी .गावित यांच्या नेतृत्वात नाशिक जिल्ह्यात ठिक ठिकाणी रस्ता रोको,चक्का जाम आंदोलन सुरू आहेत. नाशिक सुरत महामार्ग बंद आहे.पालघर व ठाणे भागात आमदार विनोद निकोले यांच्या नेतृत्वात मुंबई सुरत मार्गावर चक्काजाम आंदोलन सुरू आहे.
                     २३ ऑगस्ट २०२४ रोजी नंदुरबार मध्ये आदिवासी संघटनांकडून पेसा भरतीसाठी जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. पेसा कायदा  वाचवण्याची जबाबदारी प्रत्येक आदिवासी बांधवांची आहे.म्हणून पक्ष,संघटना,मतभेद विसरून सगळ्यांनी पेसा भरतीच्या नाशिक येथील २८ ऑगस्ट  रोजीच्या जन आक्रोश मोर्चात एकजूटीने शामिल व्हा.रस्त्यावर उतरा, अभी नही तो कभी नही,आम्ही रस्त्यावर उतरायला तयार आहोत, तुम्ही रस्त्यावर उतारा ,रास्ता रोको करा,चक्का जाम करा,सर्व शासकीय कार्यालये बंद करा,ग्रामपंचायत बंद करा,पेसा कायदा वाचवा.उठ आदिवासी जागा हो,पेसा कायदा वाचवण्याचा धागा हो! असे जाहीर आवाहन बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा यांनी नंदूरबार मधील आदिवासी बांधवांना केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या