Ticker

6/recent/ticker-posts

सव्वाशे वर्षांपूर्वीच्या नाट्य झाडीपट्टी रंगभूमीला राजाश्रयाचे चटके


दखल झाडीपट्टी रंगभूमीची


रवि भोंगाने साकोली
साकोली -पूर्व विदर्भातील चार जिल्हे हे झाडीपट्टीच्या प्रांतात येतात. या भागातील झाडीपट्टी रंगभूमीला जवळपास सव्वाशे वर्षांपूर्वीचा ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. जगातील एकमेव जिवंत नाट्यसृष्टी झाडीपट्टी रंगभूमी असल्याचेही बोलले जाते. इतका मोठा ऐतिहासिक वारसा झाडीपट्टी नाट्यसृष्टी रंगभूमीला असतांना राजाश्रयाचे चटके बसू लागलेले आहेत. विशेष महत्त्वपूर्ण बाब अशी की, गतवर्षी पूर्व विदर्भातील झाडीपट्टीचे जेष्ठ कलावंत डॉ.परशुराम खुणे यांना पद्मश्री पुरस्कार शासनाने प्रदान केला होता. यानिमित्ताने लोकप्रिय मात्र तेवढीच उपेक्षित असलेली झाडीपट्टी रंगभूमी पुन्हा एकदा चर्चेत आली. झाडीपट्टीतील स्थानिक निर्माता, लेखक दिग्दर्शक व अभिनेते यांच्या काही नाट्यकृती या अत्यंत मौलिक आहेत. गेली ५० वर्षे या रंगभूमीची सेवा करणाऱ्या डॉ.परशुराम खुणे यांना पद्मश्री जाहीर झाल्याने या रंगभूमीला खऱ्या अर्थाने सन्मान प्राप्त झाला.असे असले तरी अद्यापही झाडीपट्टी रंगभूमीला राजाश्रय दिला गेला नाही. पूर्व विदर्भ म्हणजे घनदाट जंगलाचे माहेरघर. भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्याला झाडीपट्टी संबोधले जाते. या भागात सादर होणाऱ्या नाटकांना झाडीची नाटके किंवा झाडीपट्टी रंगभूमी असेही म्हटले जाते. अफाट कला वैभव असलेली झाडीपट्टी विदर्भातील समृद्ध झाडीपट्टी आहे. या झाडीपट्टीच्या रंगभूमीला सव्वाशे वर्षाचा इतिहास आहे. शेती हाच मुख्य व्यवसाय असलेल्या झाडीपट्टीतील लोकांच्या रक्तात नाटकांचे वेड आहे. या परिसरात लोकरंगभूमी आणि नाट्य रंगभूमी या दोन्ही हातात हात घालून चालत आहेत. लोकरंगभूमीची परंपरा फार जुनी आहे. नवयुगात जिथे मुंबईची प्रचलित गिरणगावची रंगभूमी आणि कोकणातील रंगभूमी इतिहास जमा झाली तिथे सव्वाशे वर्षापासून टिकून असलेली जगातील एकमेव रंगभूमी म्हणजे झाडीपट्टी नाट्यसृष्टी रंगभूमी आहे. झाडीपट्टी रंगभूमीने आपल्या उत्कृष्ट कला व परिश्रमाच्या भरवशावर जगात सर्वश्रेष्ठ ठरली असून झाडीपट्टी नाट्य रंगभूमीने आपले स्थान अबाधित ठेवलेले आहे. चित्रपट, दूरदर्शन व विविध प्रसारमाध्यमांच्या नवीन युगातही झाडीपट्टी रंगभूमी आपले पाय घट्ट टिकवून ठेवले आहे. कालांतराने झाडीपट्टी रंगभूमी व्यवसायाकडे वळली आणि त्यानंतर देसाईगंज वडसा हे केंद्रस्थान ठरले. व्यावसायिक रंगभूमीचा उद्रेक झाल्यानंतर वडसा हे देसाईगंज नाट्य मंडळचे केंद्र ठरले. येथे ५० ते ६० नाट्यमंडळ असून गावचे लोक त्यांना पाचरण करतात आणि त्या नाटकांचा आस्वाद घेतात. ही नाटके अतिशय परीक्षण करून सिद्ध झालेली असतात. यात अतिशय श्रेष्ठ अभिनय पाहण्याचे संधी उपलब्ध होत असते. असा इतिहास झाडीपट्टी रंगभूमीला असतांनाही राजाश्रयाचे चटके झाडीपट्टी नाट्यसृष्टी रंगभूमी सहन करीत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या