• सुखदेव उर्फ राजेश मस्के यांची पोलिसांत तक्रार
कालिदास खोब्रागडे, चित्रा न्युज
भंडारा :-लाखनी तालुक्यातील गडेगाव ग्रामपंचायतीचे सरपंच, सचिवासह १४ इसमांनी संगनमत करून सुखदेव मस्के यांच्या मालकीतील आवारभिंत तसेच इतर बांधकाम जेसीबी लावून गैरकायदेशीररित्या पडल्याने ४ ते ५ लाख रुपयाचे नुकसान झाले असून संगनमताने मालमत्तेचा इजा पोहचवून नुकसान केले आहे. तसेच सुखदेव मस्के यांना शिवीगाळ करून जीवाने मारण्याची धमकी दिली आहे. त्यामुळे या १४ इसमावर भारतीय न्याय संहिता २०२३ च्या २९६, ३२४(४ व ५), ३५२, ३५१(२ व ३) व ३(५) अन्वये गुन्हा नोंद करण्यात यावा. या करिता पोलिस निरीक्षक लाखनी यांचेकडे सुखदेव मस्के यांनी तक्रार दाखल केली आहे. पोलीसांकडून काय कारवाई केली जाते याकडे ग्रामवासी जनतेचे लक्ष लागले आहे.
सुखदेव श्रीराम मस्के यांनी गडेगाव येथील गट क्रमांक ५३/२ मधील प्लॉट क्रमांक ६, ७, ८, ९, १३, १४, १५, १६ नोंदणीकृत विक्री पत्रानुसार विकत घेतलेले आहेत. सदर प्लॉट एकाच मालकाचे असल्याने उपविभागीय अधिकारी साकोली यांचेकडून सर्व प्लॉटचे एकत्रीकरण घेतल्याने नवीन गट क्रमांक ५३/२/१६ असा आहे. गट क्रमांक ५३/२/१ चा ७/१२ ग्रामपंचायतीचे नावाने आहे. पण ती जागा नगररचनाकार यांच्या मंजूर अभिलेखात नाही. दर्शविलेले रस्ते नगररचनाकार कडून ग्रामपंचायतने निश्चित केलेले नाही. कायदेशीररित्या लेआऊट नकाशा मंजूर होत नाही तो पर्यंत त्या जागेची आराजी व सिमांकन परिपूर्ण होत नाही. सरपंच ग्रामपंचायत गडेगाव यांनी उपअधीक्षक तालुका भूमीअभिलेख यांना रस्त्याच्या मोजणी करण्याबाबद कळविल्याने ७ ऑगस्ट २०२४ रोजी मोक्यावर आले. त्यामुळे सुखदेव मस्के यांनी मोजणीसाठी आक्षेप अर्ज देण्यात गेले असता सदर लेआऊट चा नकाशा नगररचनाकार यांचेकडून प्रमाणिक केला नाही किंवा प्रमाणित करण्याचे आदेश नसल्याने मोजणी करणे शक्य नसल्यामुळे आक्षेप अर्ज घेण्यास नकार दिला. नगररचनाकार यांचे मार्फत नकाशा प्रमाणित होत नाही. तो पर्यंत मोजणी होणार नाही. असे सांगून वादग्रस्त जागेची मोजणी केली नाही. असे पोलिस निरीक्षक लाखनी यांना दिलेल्या तक्रारीत नमूद आहे.
ग्रामपंचायतीच्या नावाने असलेली जागा स्पष्टरित्या दर्शविलेली नाही. त्यामुळे चतु:सीमा निर्देशित होऊ शकली नाही. ग्रामपंचायत तर्फे मोजणी करिता सुखदेव मस्के अडथळा निर्माण करू शकतो या दृष्टीने पोलिस संरक्षण घेत असल्याचे दर्शविले असे तक्रारीत नमूद आहे. ७ ऑगस्ट २०२४ ला मूळ गट क्रमांक ५३ किंवा त्या मधील प्लॉट, रस्त्याची कायदेशीर मोजणी करण्यात आली नाही. पण यातील सरपंच सचिवासह १४ इसमांनी संगनमत करून सुखदेव मस्के यांच्या मालकीच्या जागेत येऊन बेकायदेशीररित्या जमाव जमवून विना परवानगीने त्याचे मालकीच्या जागेतील बांधकाम पडण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी अटकाव केला परंतु जमावाने सुखदेव मस्के याला मारण्याचा प्रयत्न केला. तसेच अश्लील शिवीगाळ केली. जमावात १४ पैकी २ महिला होत्या त्यांनी महिला असल्याचा गैरफायदा घेऊन विनयभंग व अश्लील कृत्य केल्याचे कारणावरून सुखदेव मस्के यांनी फसविण्याचा तयारीत होत्या. असे पोलिस निरीक्षक लाखनी यांना दिलेल्या तक्रारीत नमूद आहे. त्यांनी जमावाला समजावण्याचा प्रयत्न केला पण बाजू मांडण्याची संधी न देता मोजणीशिवाय १४ इसमांनी सुखदेव मस्के यांच्या मालकीचे जागेतील आवारभिंत व इतर बांधकाम जेसीबी चे साहाय्याने पाडून ४ ते ५ लाख रुपयाचे नुकसान करून मालमत्तेला इजा पोहचविली. तसेच शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याने २ महिलांसह १४ इसमांवर गुन्हा दाखल करण्यात यावा. या करिता सुखदेव मस्के यांनी पोलिस निरीक्षक पोलिस ठाणे लाखनी यांचेकडे तक्रार केली आहे. या तक्रारीवर काय कारवाई केली जाते. याकडे ग्रामवासी जनतेचे लक्ष लागले आहे.


0 टिप्पण्या