Ticker

6/recent/ticker-posts

रिपब्लिकन ऐक्याचे विरोधी नेत्याचे घरासमोर उपोषण करू


• पत्र परिषदेत चंद्रशेखर टेंभूर्णे यांची माहिती 


कालिदास खोब्रागडे, चित्रा न्युज
भंडारा :- येथील एकिकृत रिपब्लिकन समितीचे वतीने गटातटात विखुरलेल्या रिपब्लिकन पक्षाच्या ऐक्यासाठी प्रयत्नरत असून १४ जुलै रोजी रवी भवन नागपूर येथे आंबेडकरवादी गटांच्य सर्व राज्यध्यक्षांची बैठक पार पडली. त्यात आंबेडकरवादी पक्षांची संयुक्त आघाडी तसेच एकत्रिकरणासाठी मुंबई येथे राष्ट्रीय अध्यक्षांची बैठक घेऊन पुढील रणनीती ठरविण्याचे ठरले. त्यानुसार १७ ऑगस्ट २०२४ रोजी पद्मशाली हॉल नायगाव मुंबई येथे संयुक्त बैठक आयोजित केली आहे. यास जो आंबेडकरी नेता विरोध करेल किंवा बैठकीस उपस्थित राहणार नाही. त्या नेत्याचे निवासस्थानासमोर आमरण उपोषणाचा इशारा एकिकृत रिपब्लिकन समितीचे अध्यक्ष चंद्रशेखर टेंभूर्णे यांनी पत्र परिषदेत दिला. 
                          राज्यात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अनेक गट या शिवाय अनेक आंबेडकरवादी संघटना कार्यरत आहेत. त्यांच्याकडून स्थानिक स्वराज्य संस्था, विधानसभा व लोकसभा निवडणुकीत आपापले उमेदवार उभे केले जाते. मत विभागणीमुळे एकही गट आपल्या उमेदवाराची अनामत रक्कम वाचवू शकत नाही. हीच परिस्थिती आरक्षित जागेवर सुद्धा आहे. प्रस्थापित, राष्ट्रीय व प्रादेशिक पक्षाकडून आरक्षित जागेवर निवडून येणारे लोक प्रतिनिधी आंबेडकरी समाजाचे प्रतिनिधित्व न करता ज्या पक्षाकडून निवडून आले. त्या पक्षाची हुजरेगिरी करण्यात मग्न असतात. त्यामुळे आंबेडकरी समाजाचे प्रश्न जसे च्या तसे आहेत. सत्ताधाऱ्यांकडून आंबेडकरी समाजाच्या उन्नतीसाठी चालविण्यात येणाऱ्या योजनेवरील निधी कपात केला जातो. तर खाजगीकरणाच्या नावाखाली सरकारी संस्थांमधील आरक्षण संपविण्याचे षडयंत्र सत्ताधाऱ्यांकडून रचण्यात आले आहे. भरीस भर म्हणून सर्वोच्च न्यायालयाने अनुसूचित जाती जमातीचे आरक्षणात वर्गीकरण करण्याचे आदेश पारित केल्याने आरक्षण धोक्यात आले आहे. विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जात नाही. या प्रकाराने आंबेडकरी समाजावर अन्याय, अत्याचाराचे प्रमाणात सातत्याने वाढ होत असली तरी राखीव जागेतून निर्वाचित होणारे व लोक प्रतिनिधी विधिमंडळ अथवा संसदेत ब्र सुद्धा काढत नाहीत. असे पत्र परिषदेत चंद्रशेखर टेंभूर्णे यांनी सांगितले. 
                          आंबेडकरी समाजासह इतर मागास समाजाच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी खऱ्या आंबेडकरवादी पक्षाचा प्रतिनिधी विधानसभा व लोकसभेत जाणे आवश्यक आहे. या शिवाय या समाजाचे प्रश्न सुटू शकणार नाही. या करिता गटातटात विखुरलेल्या रिपब्लिकन पक्षाचे ऐक्य व्हावे व राज्यात एक शाश्वत आंबेडकरवादी पक्ष स्थापन करण्यासाठी एकिकृत रिपब्लिकन समितीचे पुढाकाराने सर्वच गटाच्या राज्याध्यक्षांची रवी भवन नागपूर येथे संयुक्त बैठक पार पडली. त्यात सर्वच आंबेडकरवादी पक्षाची संयुक्त आघाडी करण्यात यावी. तथा मुंबई येथे राष्ट्रीय अध्यक्षांची बैठक बोलावून पुढील रणनीती ठरविण्यात यावी. असे ठरल्याने सर्व आंबेडकरवादी पक्षाच्या राष्ट्रीय व राज्याध्यक्षांची १७ ऑगस्ट रोजी पद्मशाली हॉल नायगाव मुंबई येथे बैठकीचे आयोजन केले असून सर्वच राष्ट्रीय अध्यक्षांना बैठकीचे निमंत्रण पाठविण्यात आले असून सर्वांनी बैठकीस उपस्थित राहण्याचे मान्य केले आहे. राज्यात आंबेडकरवादी पक्षाच्या एकिकरणास जो आंबेडकरी नेता विरोध करेल किंवा बैठकीला उपस्थित राहणार नाही. त्या नेत्याचे निवासस्थानासमोर एकिकृत रिपब्लिकन समितीचे नेतृत्वात आमरण उपोषण करण्याचा इशारा या समितीचे अध्यक्ष चंद्रशेखर टेंभूर्णे यांनी दिला असून या वेळी मुख्य संयोजक अमृत बनसोड, आषित बागडे, शिवदास गजभिये, दिलीप वानखेडे, विजय भोवते, संजीव भांबोरे इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या