मनिपूर येथील दंगलीत लागली होती कानाला गोळी
रवि भोंगाने साकोली
साकोली:- केंद्रीय राखीव पोलीस दलात कार्यरत जवान सुकराम मोतीराम सराटे वय ४० यांचे दि.१८ आॅगष्ट २०२४ रोजी दु. ४.४५ मिनिटांंनी टाटा कँन्सर हाॅस्पीटल मुंबई येथे निधन झाले. त्यांचे पार्थिव दि.१९ आॅगष्ट रोजी सायंकाळी पिंडकेपार येथे आणण्यात आले. त्यांच्या पार्थिवावर अत्यंत शोकाकूल वातावरणात दि.२० आॅगष्ट रोजी स. ९ वाजता पिंडकेपार येथील स्मशानभूमीत लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी उपस्थित जवानांनी हवेत पाच राऊंड फायर करून शहीद सुकराम सराटे यांना श्रद्धांजली दिली. यावेळी संपूर्ण गाव मोठ्या संख्येने श्रद्धासुमने वाहण्यासाठी उपस्थित होता. शहीद सुकराम सराटे हे केंद्रीय राखीव पोलीस दलात २००४ ला रूजू झाले होते. गुजरात मध्ये कार्यरत असतांना २०२१ मध्ये ते मनिपूर येथे दंगल शमविण्यासाठी गेले होते. तिथे झालेल्या चकमकीत त्यांच्या कानाला शत्रूची गोळी लागून जबर इजा झाली होती. तीन दिवस ते कोमात होते. रूग्णालयात उपचार घेतल्यानंतर पुन्हा २०२३ मध्ये ते मनिपूर येथे कॅम्पसाठी गेले असता तिथे परत ती जखम चिघळली व तिचे पर्यवसान कँन्सरमध्ये झाले. त्यांच्या जखमेवर शस्त्रक्रिया करण्यात आली व त्यानंतर पुन्हा ते गुजरातमधील अहमदाबाद येथे रूजू झाले. नुकतीच त्यांची बदली पुणे येथे झाली होती. जखम पुन्हा चिघळल्याने त्यांच्यावर टाटा कँन्सर हाॅस्पीटल मुंबई येथे उपचार सुरू होते. उपचार दरम्यानच त्यांचे दि.१८ आॅगष्ट रोजी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, आई, वडील व भाऊ असा आप्तपरिवार आहे. त्यांच्या अकाली निधनाने संपूर्ण गावावर शोककळा पसरली असून परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
0 टिप्पण्या