• ३ प्रकरणे नामंजूर, १ प्रलंबित
• १० प्रकरणात अनुदान वाटप
कालिदास खोब्रागडे, चित्रा न्युज
भंडारा :- नैसर्गिक आपत्तींमुळे मृत्यू झालेल्या शेतकरी व आश्रीतास स्व. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना सुरू आहे. लाखनी तालुक्यात आर्थिक वर्ष २०२३-२४ व २०२४-२५(ऑगस्ट २०२४ पर्यंत) २१ प्रस्ताव कृषी विभागाकडे दाखल करण्यात आले होते. त्यापैकी १७ प्रस्तावास मंजुरी प्रदान करण्यात आली असून ३ प्रस्ताव नामंजूर तर १ प्रस्ताव प्रलंबित आहे. १० प्रकरणात अनुदान वाटप करण्यात आले असल्याचे तालुका कृषी अधिकारी लाखनी यांनी कळविले आहे. नामंजूर व प्रलंबीत प्रस्ताव लवकरात लवकर निकाली काढणे गरजेचे झाले आहे.
शेती व्यवसाय करतांना होणाऱ्या अपघातामुळे शेतकऱ्याला मृत्यू ओढवतो किंवा अपंगत्व स्वीकारावे लागते. अशा कालावधीत शेतकऱ्याच्या कुटुंबाची आर्थिक स्थिती खालावते. त्यासाठी ह्या शेतकरी अपघात विमा योजनेस सुरुवात करण्यात आली. जेणे करून गरीब शेतकरी कुटुंबाला मदतीचा हात दिला जाईल. २००५-०६ पासून ही योजना सुरू करण्यात आली. त्यावेळी "शेतकरी जनता अपघात विमा योजना" असे नाव होते. ते बदलून पुढे "गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना" असे करण्यात आले. २००९-१० मध्ये या योजने करिता १ लाख एवढा विमा संरक्षित केला गेला होता. २०१५-१६ पासून ही रक्कम वाढवून २ लाख रुपये करण्यात आली. अंगावर विज पडून मृत्यू येणे, नैसर्गिक आपत्ती, पूर, सर्पदंश, विंचू दंश, वाहन अपघात, रस्त्यावरील अपघात आणि विजेचा शॉक लागून मृत्यू झाल्यास अथवा कायमचे अपंगत्व आल्यास या योजनेतून आर्थिक लाभ दिल्या जातो.
साकोली व लाखांदूर तालुक्याचे विभाजन करून लाखनी तालुक्याची निर्मिती करण्यात आली. १ नगर पंचायत व ७१ ग्रामपंचायतीत १०४ गावे समाविष्ट असून ९४ लोकवस्तीची तर १० गावे रिठी आहेत. लोकसंख्या १ लाख २८ हजार ५४५ आहे. तालुक्याचे भौगोलिक क्षेत्र ३३ हजार १७३.३६ हेक्टर असून पेरणी खालील सर्वसाधारण क्षेत्र २४ हजार ६९० हेक्टर आहे. तर खातेदार शेतकरी संख्या अंदाजे ३६ हजार आहे. लाखनी तालुक्यात गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेचे आर्थिक वर्ष २०२३-२४ व २०२४-२५ मध्ये २१ प्रस्ताव तालुका कृषी अधिकारी कार्यालय लाखनी मार्फत शासनाकडे पाठविण्यात आले. त्यापैकी १७ प्रस्ताव मंजूर करण्यात आले. ३ प्रस्ताव नामंजूर तर १ प्रस्ताव प्रलंबित आहे. १० प्रकरणात अनुदान वाटप करण्यात आले असल्याचे तालुका कृषी अधिकारी लाखनी यांनी कळविले आहे. नामंजूर व प्रलंबित प्रकरणे लवकरात लवकर निकाली काढणे आवश्यक झाले आहे.
असे आहे योजनेचे स्वरूप
गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेत जर शेतकऱ्याचा अपघाती मृत्यू झाला असेल तर त्या शेतकरी कुटुंबाला २ लाख रुपये विमा तसेच ज्या शेतकऱ्याला २ डोळे किंवा २ अवयव गमवावे लागले असतील त्या शेतकरी कुटुंबास २ लाख रुपये विमा देण्याची तरतूद आहे. तसेच १ डोळा व १ अवयव निकामी झाल्यास २ लाख रुपये तर १ अवयव किंवा १ डोळा निकामी झाला असल्यास १ लाख रुपये विमा संरक्षण देण्याची तरतूद आहे.
हे आहेत लाभार्थी
(१) सीमा अतुल बांते कनेरी (२) सिताराम सदाशिव झलके खराशी (३) पुरुषोत्तम तुळशीराम मेश्राम खैरी (४) मंदा भगवान शिवणकर चिचटोला (५) कविता दयाराम भोंडे मेंढा/भू. (६) प्रीती सुशील हटनागर लाखनी (७) शारदा गिरीपाल उईके मिरेगाव (८) योगिता मोरेश्वर घोनमोडे मचारना (९) वर्षा खोमेश गिरेपुंजे मुरमाडी/सावरी (१०) आशा महादेव वाघ मोरगाव (११) कुसुमाकर माधवराव बोंद्रे कनेरी (१२) संजय भिवा बनसोड इसापूर (१३) अल्का देवेंद्र काळे कोलारी (१४) सीमा संदेश मेश्राम पिंपळगाव/सडक (१५) शुभांगी सुभाष गोंधुळे लाखोरी (१६) शारदा प्रल्हाद चुद्रे रेंगेपार/कोठा (१७) चींतेश नत्थु मने सावरी. हे लाभार्थी आहेत.


0 टिप्पण्या