प्रतिनिधी : राजेश येसेकर
चंद्रपूर : वाढदिवसाचे औचित्य साधून सामाजिक कार्यकर्ते तथा गोंडवाना विद्यापीठाचे उत्कृष्ट विद्यार्थी पुरस्कार प्राप्त रुपेश पांडुरंग कुतरमारे यांनी पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत वृक्षारोपणाचा उपक्रम राबविला. हा उपक्रम युथ सोशलग्राम फाउंडेशन महाराष्ट्र राज्य समिती, गुरुदेव सेवा मंडळ, बोपापूर, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, बोपापूर, शिवछत्रपती युवा क्रीडा मंडळ तसेच गट ग्रामपंचायत कार्यालय, खापरी यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आला.
रुपेश कुतरमारे हे गेल्या काही वर्षांपासून पर्यावरण संरक्षणासाठी सातत्याने कार्यरत आहेत. सन २०२३ पासून २०२६ पर्यंत त्यांनी ५० हून अधिक वृक्षांची लागवड केली असून, त्यापैकी ३० पेक्षा अधिक वृक्ष आजही निरोगी अवस्थेत वाढत आहेत. वृक्षारोपणासोबतच त्यांच्या संगोपनाला प्राधान्य देत नियमित पाणी, संरक्षण आणि देखभाल केल्यामुळे अनेक वृक्ष आज पर्यावरण समृद्ध करण्याचे कार्य करत आहेत.
महाविद्यालयीन शिक्षणादरम्यान राष्ट्रीय सेवा योजना (NSS) अंतर्गत राबविण्यात आलेल्या 'तीन वृक्ष दत्तक' उपक्रमातही त्यांनी सक्रिय सहभाग घेतला होता. त्या वेळी दत्तक घेतलेले तीनही वृक्ष आजही महाविद्यालयाच्या परिसरात चांगल्या प्रकारे वाढत असून, वृक्षसंवर्धनाबाबतच्या त्यांच्या सातत्यपूर्ण बांधिलकीची साक्ष देत आहेत.
यावेळी रुपेश कुतरमारे यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त एक वृक्ष लावून त्याचे संगोपन करण्याचा संकल्प केला. "वृक्ष लावणे ही पर्यावरण संवर्धनाची सुरुवात आहे; मात्र त्याचे जतन आणि संवर्धन करणे ही प्रत्येकाची सामूहिक जबाबदारी आहे," असे मत त्यांनी व्यक्त केले. प्रत्येक नागरिकाने वाढदिवस, विवाहदिन किंवा इतर आनंदाच्या क्षणी किमान एक वृक्ष लावून त्याचे संगोपन करण्याचा संकल्प करावा, असे आवाहनही त्यांनी केले.
या उपक्रमाद्वारे पर्यावरण संरक्षण, जैवविविधतेचे संवर्धन आणि हरित महाराष्ट्राच्या संकल्पनेला बळकटी देण्याचा प्रयत्न करण्यात आला. सहभागी संस्थांनीही अशा सामाजिक व पर्यावरणपूरक उपक्रमांना भविष्यात अधिक व्यापक स्वरूप देण्याचा निर्धार व्यक्त केला.
वाढदिवसानिमित्त राबविण्यात आलेला हा उपक्रम परिसरातील नागरिकांसाठी प्रेरणादायी ठरत असून, "वृक्ष लावा, वृक्ष जगवा" हा संदेश प्रभावीपणे समाजापर्यंत पोहोचविण्याचा निश्चय केला आहे.


0 टिप्पण्या