• ४ महिन्याचे मानधन रखडले
कालिदास खोब्रागडे चित्रा न्युज
भंडारा :- डिजिटल महाराष्ट्र घडविण्याचे ध्येय उराशी बाळगून तुटपुंज्या मानधनात काम करणाऱ्या संगणक परीचारकास जुलै ते ऑक्टोबर २०२४ ह्या ४ महिन्याचे मानधन दिले गेले नसल्यामुळे उपासमारीची वेळ आली आहे. दिवाळी अंधार जाणार आहे. त्यामुळे उपाशी पोटी काम कसे करावे ? असा प्रश्न आवासून उभा असून आर्थिक अडचणीमुळे कुटुंबात कलह निर्माण झाले असून आवश्यक वस्तू उधारीवर मिळेनाशा झाल्या असल्यामुळे प्रपंचाचा गाडा हाकणे अशक्यप्राय बाब झाली असल्याने संगणक परीचालकांचा मानधनाचा तिढा सुटता सुटेना असे चित्र दिसत आहे.
महाराष्ट्र शासनाच्या वित्त आयोग प्रकल्पा अंतर्गत मागील १३ वर्षापासून ग्राम पातळीवरील स्थानिक स्वराज्य संस्था स्तरावर संगणक परिचालक प्रामाणिकपणे आपली सेवा देत असून जन्म-मृत्यू-विवाह, नमुना ८, क्रियासॉफ्ट, १ ते ३३ नमुने, विविध शासकीय योजना व इतर कार्यालयीन सेवा, गावकऱ्यांना विविध प्रकारचे आवश्यक ते प्रमाणपत्र एकाच छताखाली संगणक परिचालकाचे माध्यमातून देण्यात येतात. हा प्रकल्प संगणकीय ग्रामीण महाराष्ट्र(संग्राम) म्हणून कार्यरत होता. त्यानंतर महाराष्ट्र शासनाने सी.एस.सी. या खासगी कंपनीमार्फत "आपले सरकार सेवा केंद्र" चालविले जात होते. आर्थिक वर्ष २०२४-२५ पासून पुन्हा कंपनी बदलविण्यात आली.
ग्रामपंचायत स्तरावर १५व्या वित्त आयोगामार्फत १२ हजार रुपये प्रति महिना या प्रमाणे वार्षिक एकत्रित मानधन जिल्हा परिषदेला आरटीजीएस व्दारे ग्रामपंचायतीकडून अदा केले जाते. मात्र संगणक परीचालकास मानधन वेळेवर आणि दरमहा कधीच मिळत नाही. त्यामुळे संगणक परीचालकाला आर्थिक विवंचनेत जीवन यापन करावे लागते. या बाबीस कंटाळून काही संगणक परिचालकाकडून आत्महत्याही केल्या असल्याचे समजते.
संगणक परिचालक तुटपुंज्या मानधनावर आपली सेवा देत असला तरी त्याला वेळेवर मानधन कधीच मिळाले नाही. या विरोधात संगणक परिचालकांनी किती तरी वेळा कामबंद आंदोलन केले होते. आर्थिक वर्ष २०२४-२५ पासून रेलटेल कंपनीला कंत्राट देण्यात आले असून ह्या नव्या कंपनीनेही जुलै ते ऑक्टोबर २०२४ चे मानधन अदा केले नाही. त्यामुळे संगणक परिचालकांची दिवाळी अंधारात जाणार आहे. कंपनी बदलल्यामुळे जुलै ते ऑक्टोबर २०२४ चे मानधन मिळेल का ? असा संगणक परीचालकांत संभ्रम निर्माण झाला आहे. संगणक परिचालकाच्या कुटुंबाचा विचार करून दिवाळी पूर्वी तसेच दर महिन्याला मानधन देण्यात यावे. तसेच थकीत असलेले ४ महिन्याचे मानधन तात्काळ अदा करणे आवश्यक झाले आहे.


0 टिप्पण्या