धान उत्पादक चिंतेत,अळीवर नियंत्रण येईना
कालिदास खोब्रागडे चित्रा न्युज
भंडारा - खरीप हंगामात धान हे मुख्य पिक आहे.धान पिक परिपक्वतेच्या अवस्थेत असून लष्करी अळीचे तसेच तुळतुळ्याचे आक्रमण वाढले आहे. त्यामुळे हातात आलेले पिक नष्ट होण्याच्या मार्गावर असून त्याचा उत्पादनावर परिणाम होणार असून उत्पादनात घट येणार असल्यामुळे धान उत्पादक चिंतातुर झाला आहे. कधी नव्हे असा मोठा हल्ला लष्करी अळीने चालविल्याने शेतात अक्षरश: लोंबींचा सड़ा पडलेला दिसत आहे. त्यामुळे अपरिपक्वतेच्या अवस्थेतच अनेकांनी धान कापणीला प्रारंभ केला आहे. कापणी व मळणी चे काम लवकर व्हावे, यासाठी हार्वेस्टरचा वापर होत आहे. परंतु उत्पादनात मोठी घट आल्याचे शेतकरी सांगत आहेत. फवारणी करून उपयोग होत नसल्याचे ही शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
तालुक्यात मध्यम किंवा मोठा सिंचन प्रकल्प अस्तित्वात नसल्यामुळे बहुतांश शेती पावसाचे पाण्यावर अवलंबून कोरडवाहू आहे. त्यात ९० ते ११० दिवसात निघणाऱ्या हलक्या प्रजातीच्या धानाची लागवड केली जाते. सध्य परिस्थितीत हलक्या प्रजातीचे धान कापून बांधून झाले आहे सिंचनाची सोय असणार्या शेतकर्यांकडे १३५ ते १५० दिवसात निघणारे उच्च प्रजातीचे धान आहे. सध्या हलके धान परिपक्व होवून कापणी व मळनीच्या मार्गावर आहेत तर मध्यम व उच्च प्रतीचे धानाचा निसवा सुरु आहे. बदलत्या वातावरणामुळे धानावर तुळतुडा, लष्करी अळीचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे या रोगाचे व्यवस्थापन करणे आवश्यक झाले आहे.
सिंचंनाची सोय असणारा शेतकरी जय श्रीराम, केसर, महाराजा, सोनम, १०१० यासारख्या भारी प्रजातीच्या धानाची लागवड करतात. चालू खरीप हंगामात मृग नक्षत्राचे शेवटी व आद्रा नक्षत्राचे सुरुवातीला समाधानकारक पाऊस झाल्यामुळे धानाची पेरणी करण्यात आली. तसेच रोवणीही मुदतीच आटोपली. मध्यम व भारी प्रतीचे धानाचा निसवा सुरू आहे. वातावरणातील बदलामुळे करपा ,कडीकरपा , गादमाशी , खोडकिडा इत्यादी रोगांचा प्रादुर्भाव झाला होता. त्यावर कीटकनाशक फवारणी करून परिस्थिती पूर्वपदावर आणली गेली पण परिपक्व झालेल्या व निसवा होऊ घातलेल्या मध्यम व उच्च प्रजातीच्या धान पिकावर तुळतुडा व लष्करी अळीचा ह्या रोगाचा प्रादुर्भाव झाल्याचे आढळून आले आहे. त्यावर वेळीच उपाययोजना करण्याची गरज आहे.त्यामुळे कधी नव्हे असा हल्ला लष्करी अळीने सुरू केला आहे. लष्करी अळीचा झुंड मोठा असल्यास एका कापलेल्या पानावरही लष्करी अळीचा प्रादूर्भाव दिसून येत आहे.
*असे असते लष्करी अळीचे जीवनचक्र(चौकट)*
लष्करी अळीचा पतंग मध्यम आकाराचा १ ते २ सेमी लांब असतो. समोरील पंख गडद पिगट व त्यावर काळसर ठिपका आणि कडेवर नागमोडी पट्टे असतात. पूर्ण वाढलेली अळी २.५ ते ४ सेंमी. लांब ,लठ्ठ ,मऊ हिरवी, काळी आणि अंगावर लाल पिवळसर उभ्या रेषा असतात. मादी २०० ते ३०० अंडी समूहाने घालते. अंडी करड्या रंगाच्या केसांनी झाकलेली असतात. अंडी अवस्था ५ ते ८ दिवस, अळी अवस्था २० ते २५ दिवस व कोषावस्था २० ते १५ दिवसांची असते,. कोष धानाच्या बुंध्याजवळील बोचक्यात जमिनीत आढळतात. एक पिढी पूर्ण होण्यास ३० ते ४० दिवस लागतात. रात्रीत ३०० ते ४०० मीटर अंतरावरातील पीक नेस्तनाबूत होत असल्याने शेतकरी हतबल झाला आहे. जिल्ह्यात सद्यस्थितीतील लष्करीअळींच्या प्रादुर्भावासाठी पोषक असे वातावरण आहे. त्यामुळे केव्हाही उद्रेकीय स्थिती निर्माण होऊ शकते. त्यामुळे शेतकरी बांधवांनी आपल्या धान पिकाची पाहणी करून तातडीने उपाययोजना कराव्यात, असे आवाहन कृषी अधिकाऱ्यांनी केले आहे.
*रात्री लष्करासारखा हल्ला(चौकट)*
लष्करी अळी धान पीक परिपक्वतेच्यावेळी नुकसान करतात. कमी प्रमाणात प्रादुर्भाव असल्यास दिवसा झाडांच्या बुंध्यात देठाखाली ,दगडाखाली, बांधीत पाणी नसताना डिगायाच्या खाली लपून राहतात. रात्री पिकांचे नुकसान करतात. पीक पक्वतेवेळी अख्या लोंब्या कुरतडून शेतात लोंब्यांचा सडा पाडतात. ४ ते ५ अळ्या प्रति चौ. मी. प्रमाणे नुकसान करतात.
0 टिप्पण्या