Ticker

6/recent/ticker-posts

पुरकाबोडी परिसरात वाघीनिसह २ शावकांचे दर्शन

गावकऱ्यात भीतीचे वातावरण 

वन अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून दिवसा व रात्री गस्त सुरू

कालिदास खोब्रागडे चित्रा न्युज 
भंडारा - वनपरिक्षेत्र अधिकारी अड्याळ चे अधिनास्त सहवन क्षेत्र माडगी व किटाडी चे सीमावर्ती भागातील वनव्याप्त भागात पट्टेदार वाघिनिसह दोन शावकांचे दर्शन सातत्याने होत असल्यामुळे गावकऱ्यांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे . या पट्टेदार वाघिणीने काही शेतकऱ्यांच्या पाळीव जनावरांची ही शिकर केली असल्यामुळे जनतेत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या परिसरातील शेतकरी वाघिणीच्या भीतीमुळे शेतावरही जाण्याकरिता घाबरत आहेत. या वाघिणीला हुसकावून लावण्यासाठी वन अधिकारी व कर्मचाऱ्यांतर्फे दिवस आणि रात्रीला गस्त केली जात आहे. ही वाघीण गावालगत असल्याचा सुगावा लागताच फटाके फोडून तिला वन क्षेत्रात जाण्याकरिता वन कर्मचारी प्रवृत्त करीत आहेत. 
       वनपरिक्षेत्र अड्याळ चे अधिंनस्त असलेल्या किटाडी व माडगी सहवन क्षेत्राचे सीमावर्ती भागात मोठ्या झाडाचा पुरातन जंगल ,टेकड्या , दऱ्याखोऱ्या व प्रसिद्ध न्याहरवानी/डोंगरगाव तसेच मांगलीबांध असल्यामुळे बारा ही महिने पाण्याची सोय असल्याने या परिसरात हिंस्त्र श्वापदासह तृणभक्षी प्राणी व सरपटणाऱ्या प्राण्यांचा अधिवास आहे. या सहवन क्षेत्राचे सीमावर्ती भागात माडगी, खुर्शिपार , पुरकाबोडी , न्याहारवानी / डोंगरगाव, केसलवाडा/राघोर्ते , रेंगोळा, इसापूर इत्यादी गावातील शेतकऱ्यांची पाळीव जनावरे  चराईकरीता जात असतात. या पट्टेदार वाघिणीने अभिमान राऊत यांचा एक गोरा व एक गोरी तसेच एका शेतकऱ्याच्या दोन म्हशी व बकऱ्यांची सुद्धा शिकार केली असल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. शावकांसह ही पट्टेदार वाघीण वनक्षेत्र सोडून शेतशिवारात ही अनेकांना दिसले त्यामुळे वनक्षेत्रालगत असलेल्या शेतजमिनीत शेतकरी जाण्यास घाबरत आहे. सध्या हलक्या व मध्यम प्रतीचे धान परिपक्व झाले असून कापणी सुरू करण्याचे विचारात अनेक शेतकरी असले तरी या वाघिणीचे दहशतीमुळे कापणी सुरू करावी की करू नये या विवंचनेत आहेत. 
      माडगी व किटाडी सहवनक्षेत्राचे सीमावर्ती भागात दोन शावकांसह वाघीण मागील आठवडाभरापासून वास्तव्यास असल्याची माहिती होताच उपवन संरक्षक राहुल गवई यांचे मार्गदर्शनात सहायक वनसंरक्षक नीलख, वनपरिक्षेत्र अधिकारी विवेक येवतकर , क्षेत्र सहाय्यक मुकेश शांमकुवर , वनरक्षक संदीप गायकवाड ,नितीन पारधी , शहरे मॅडम , रंगारी मॅडम , देशमुख मॅडम यांनी ज्या परिसरात  वाघिणीचा वावर आहे त्या परिसरात ट्रॅप कॅमेरे लावून वाघिणीचे हालचालींवर लक्ष ठेवून आहेत. वाघीण व शावक गावालगत येऊन जीवित हानी होऊ नये याकरिता वन अधिकारी व कर्मचाऱ्यांना सतर्कतेचा इशारा वन विभागामार्फत देण्यात आला आहे. वाघिणीचे लोकेशन लोकवस्तीलगत आढळल्यास वन कर्मचाऱ्यांमार्फत फटाके फोडून वाघीण व शावकास वनक्षेत्रात जाण्यास प्रवृत्त करण्यात येत असले तरी या परिसरातील जनतेत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वनविभागाने वघिनिसह शावकाचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या