Ticker

6/recent/ticker-posts

कृषी विभागाच्या अधिकारी यांची लाच प्रकरणी जामीनावर मुक्तता


चित्रा न्युज ब्युरो
सोलापूर :- पंढरपूर येथील खत व औषध निर्मिती कंपनीच्या उत्पादनाच्या दर्जाबाबत कारवाई न करण्यासाठी ५०,००० रुपयांच्या लाचेची मागणी केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेले कृषी विभागाचे गुणवत्ता नियंत्रण अधिकारी दत्ता नारायण शेटे (वय ४२, रा. म्हाडा कॉलनी, पिंपरी चिंचवड, पुणे) यांना बार्शी येथील विशेष न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.

दि. १९ ऑक्टोबर २०२४ रोजी दत्ता शेटे यांनी मंद्रुप येथे तपासणीदरम्यान पंढरपूर येथील एका खत व औषध निर्मिती कंपनीच्या उत्पादनाच्या दर्जाबाबत कारवाई न करण्यासाठी ५०,००० रुपयांच्या लाचेची मागणी केल्याचा आरोप होता. संबंधित कंपनीच्या मालकांनी यासंदर्भात अॅन्टी करप्शन विभाग, सोलापूर येथे तक्रार नोंदवली होती. त्यानंतर अॅन्टी करप्शन पोलिसांनी सापळा रचून आरोपीला अटक केली होती आणि त्यांच्या शासकीय वाहनातून ६,१४,००० रुपयांची रक्कम जप्त करण्यात आली होती.

आरोपीने अॅड. शशि कुलकर्णी यांच्या मार्फत बार्शी येथील विशेष न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला. सुनावणीदरम्यान आरोपीच्या वकिलांनी युक्तिवाद केला की, दत्ता शेटे यांनी कोणतीही रक्कम मागितलेली नाही, तसेच तपास पूर्ण झाला असून आरोपी पुढील तपासात सहकार्य करत आहे. या युक्तिवादाचा विचार करून न्यायालयाने आरोपीस जामीन मंजूर करण्याचा आदेश दिला.

विशेष न्यायाधीश व्ही. के. मांडे यांनी जामीन मंजूर करताना अटी घातल्या की, आरोपीने पुढील तपासासाठी पोलीस स्टेशनला बोलावल्यास हजर राहावे. फौजदारी जामीन अर्ज क्र. ६५६/२०२४ अंतर्गत न्यायालयाने हा आदेश दिला.

आरोपीच्या बाजूने अॅड. शशि कुलकर्णी, अॅड. मिलिंद खुपसुरे, अॅड. अजिंक्य पुराणिक, अॅड. आशुतोष पुरवंत आणि अॅड. प्रणव उपाध्ये यांनी युक्तिवाद केला, तर सरकार पक्षातर्फे अॅड. देशमुख यांनी काम पाहिले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या