• स्थानिक गुन्हे शाखा भंडारा ची कारवाई
• ४ लाख ५६ हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त
चित्रा न्युज ब्युरो
भंडारा :-लाखनी तालुक्यातील पालांदूर पोलिस ठाण्याचे हद्दीत अवैध रेती वाहतूकिवर कारवाई करण्याकरिता स्थानिक गुन्हे शाखा भंडारा चे पोलिस उपनिरीक्षक शिवराज जाधव पट्रोलिंग करीत असताना लाल रंगाचा महिंद्रा कंपनीचा ट्रॅक्टर क्रमांक एमएच ३६ एल ३५५० ने चुलबंद नदी खोऱ्यातील बारस्कर यांचे शेताजवळ विना परवाना अवैध रेतीची वाहतूक करतांना बुधवार(ता.६ नोव्हेंबर) रोजी दुपारी १२:०० वाजता मिळून आल्याने ट्रॅक्टर चालक/मालकावर पालांदूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून ४ लाख ५६ हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपी ट्रॅक्टर चालक/मालकाचे नाव चालक प्रफुलनाथ सुदान मकवाने(२१) रा. भूगाव(मेंढा), मालक प्रशांत बाळकृष्ण नागलवाडे(३८) रा. न्याहारवानी, तालुका लाखनी असे आहे. या कारवाईने रेती माफियांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
चुलबंद नदी पात्रातील पळसगाव, विहिरगाव(कन्हाळ्या), मरेगाव इत्यादी रेती घाटातून अवैध रेती उपसा व वाहतूक होत असल्याचे वृत्त वर्तमानपत्रात प्रकाशित झाल्याची दखल जिल्हा पोलीस अधीक्षक नुरूल हसन यांनी घेऊन चुलबंद नदी खोऱ्यातील अवैध रेती वाहतूक बंद करण्याचे स्थानिक गुन्हे शाखा भंडारा यांना आदेश दिले. बुधवारी सकाळपासूनच पोलिस उपनिरीक्षक शिवराज जाधव यांचे नेतृत्वातील पथक चुलबंद नदीखोऱ्यात पेट्रोलिंग करीत असताना दुपारी १२:०० वाजता दरम्यान बारस्कर यांचे शेतीजवळ महिंद्रा कंपनीचा लाल रंगाचा ट्रॅक्टर क्रमांक एमएच ३६ एल ३५५० व विना क्रमांकाची ट्रॉली दिसून आल्याने ट्रॅक्टर चालकास रॉयल्टीबाबद विचारणा केली असता नसल्याचे सांगितले. तसेच ट्रॅक्टर मालक प्रशांत नागलवाडे यांचे सांगण्यावरून रेती तस्करी करत असल्याचे सांगितल्याने ट्रॅक्टर ट्रॉली व १ ब्रास रेती असा एकूण ४ लाख ५६ हजार रुपयाचा मुद्देमाल पंचासमक्ष घटनास्थळावर जप्त करून अवैध रेतीची वाहतूक, पर्यावरणाचे नुकसान करून शासनाचा महसूल बुडविल्याने ट्रॅक्टर चालक प्रफुल्ल मकवाने व मालक प्राधान्य नागलवाडे यांचे विरुद्ध पोलिस उपनिरीक्षक शिवराज जाधव यांचे फिर्यादीवरून पालांदूर पोलिस ठाण्यात अपराध क्रमांक १८८/२०२४ कलम ३०३(२), ४९भारतीय न्याय संहिता, महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम(गौण खनिज) सहकलम ४८(८), पर्यावरण संरक्षण अधिनियम १९८६ चे सहकलम ७, ९ आणि मोटारवाहन कायदा सहकलम ३(१)/१८१ नुसार गुन्हा दाखल केला असून पोलिस हवालदार दिलीप भोयर तपास करीत आहेत. वृत्त लिही पर्यंत आरोपीस अटक केली गेली नव्हती. या कारवाईने रेती तस्करांचे धाबे दणाणले आहेत.
0 टिप्पण्या