Ticker

6/recent/ticker-posts

माजी मालगुजारी(मामा) तलाव अतिक्रमणाच्या विळख्यात

तलावांची सिंचन क्षमता निम्म्यावर 

 स्थानिक स्वराज्य संस्थांनी लक्ष देण्याची गरज

कालिदास खोब्रागडे, चित्रा न्युज
भंडारा :- तलावाचा जिल्हा म्हणून सुपरिचित असणाऱ्या भंडारा जिल्ह्यातील साकोली उपविभागात एकूण ५६५ ‘मामा’(माजी मालगुजारी) तलावांपैकी साकोली तालुक्यात२४८, लाखनी तालुक्यात १२७, लाखांदूर तालुक्यात १९० मामा तलाव असून गाव खेड्यातील अतिक्रमण धारक महसूल तसेच झुडपी जंगल परिसरातील शासकीय जागेतील तलावावर डोळा ठेवून काहींनी अतिक्रमण करण्याचा सपाटा लावला आहे. याला प्रशासनाचा नाकर्तेपणा आणि कारवाईचा अभाव कारणीभूत आहे. परिणामी अतिक्रमण कर्त्यांकडून गावातील शासकीय जमिनी गिळंकृत केल्या जात आहेत. असाच प्रकार साकोली उपविभागाअंतर्गत लघु पाटबंधारे विभागातील मामा तलाव पुन्हा अतिक्रमणाच्या विळख्यात सापडलेले आहे.   
                      अतिक्रमणकर्त्यांनी शेती जवळील तलावात माती भरून त्याचे जमिनीत रूपांतर करण्याचा डाव आखून पाऊल टाकले आहे. हा प्रकार सुरू असूनही प्रशासन आणि स्थानिक लोकप्रतिनिधी याकडे डोळेझाक करत आहेत. त्यामुळे साकोली उपविभागतील तलावाचे अस्तित्व धोक्यात आले असून, अतिक्रमण धारकावर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. शेती जवळ असलेले तलाव नेहमीच अतिक्रमणकर्त्यांच्या रडारवर राहिल्याने तलावाचे क्षेत्र कमी होऊन बहुतांश तलावांतील पाणी साठा निम्म्यावर आले आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील लोकांना पाणीटंचाईच्या तीव्र झळा सोसावा लागल्याशिवाय राहणार नाही. ब्रिटिश राजवटीपूर्वीच्या मालगुजारीच्या काळात तयार करण्यात आलेले हे तलाव सिंचनासाठी आजवर अतिशय उपयुक्त ठरत आले आहेत. गेल्या अनेक वर्षांंपासून या तलावांवर ग्रामीण भागातील लोकांची तहान भागत असे. बहुतांश तलावांवर महिला कपडे, धुणीभांडी यासारखी छोटी कामेही करीत असत. मात्र, अतिक्रमणमुळे तलावाचे क्षेत्र घटल्याने बहुतांश लाखनी तालुक्यातील मामा तलाव आटण्याचा मार्गावर असून गावकऱ्यांना पाण्यासाठी दाही दिशा फिरावे लागणार आहे. लाखनी तालुक्यात मध्यम व लघु सिंचन प्रकल्प नसल्याने तालुक्यात लहान मोठे मामा तलाव असलेत री ग्रामपंचायत तसेच पाणीपुरवठा समितीचे कोणतेच पाण्याचे नियोजन नसल्याने हा प्रकार असाच राहिला तर लोकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागू शकते. उन्हाळ्यात हे तलाव गावातील गुराढोरांची तहान भागवित होते. आता या पाळीव प्राण्यांनाही पाणी मिळेनासे होणार आहे. पावसाळ्यात भरपूर प्रमाणात पाऊस येत असला तरी तालुक्यातील माजी मालगुजार तलावात पाणी साठविण्याची योजना नाही. ऐकेकाळी शंभर हेक्टर शेतीला सिंचनाची सोय करून देणारे मालगुजारी तलाव शासन व संबंधित विभागाच्या दुर्लक्षामुळे निरूपयोगी ठरत आहेत. दरवर्षी तलावातील गाळ काढण्यासाठी योजना आखण्यात येते. काही तलावात ही योजना यशस्वी होते तर काही तलाव भ्रष्टाचारामुळे पोखरत आहे. त्या काळातील मालगुजारांनी लोकसहभागातून मालगुजारी तलावांची निर्मिती केली. तालुक्यात अशा मालगुजारी तलावांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. मात्र जिल्हा परिषदेला लघु पाटबंधारे विभागाकडे आलेले मालगुजारी तलाव रोहयोच्या कामापुरते उरले आहेत. त्यामुळे पावसाळ्यात भरलेला तलाव दोन महिन्यातच रिकामा होतो. याकडे सिंचनाबरोबरच जनावरांना पिण्यासाठी पाणी मिळत नाही. शासनाने तलाव ताब्यात घेतले मात्र अतिक्रमण मुक्त करून देखभाल दुरुस्तीकडे दुर्लक्ष करीत आहेत. शासनाने जर तलावाचे खोदकाम, मातीकाम, जिर्ण पर्यायी दुरूस्ती, गाळ काढणे याकडे लक्ष देवू केल्यास तलावाचे भाग्य उजळू शकते अन्यथा मागील वर्षीप्रमाणे उन्हाची तीव्रता राहिली तर ज्या मामा तलावांमध्ये पाणी शिल्लक आहे. तेथील पाण्याची पातळी देखील कमी होईल आणि तलाव फक्त नकाशावरच राहतील यात शंका नाही.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या