Ticker

6/recent/ticker-posts

काँग्रेसने लोकसभेतील मतदानाची टक्केवारी न टिकविल्याने पराभव

• भंडारा, साकोली, अर्जुनी/मोर विधानसभा क्षेत्रातील वास्तव

कालिदास खोब्रागडे चित्रा न्युज 
भंडारा :- ६ महिन्यापूर्वी पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा घटकपक्ष असलेल्या काँग्रेस चे उमेदवार डॉ. प्रशांत पडोळे यांना भंडारा, साकोली, अर्जुनी/मोर व तुमसर येथे आघाडी मिळाल्याने त्यांचा विजय झाला. ती आघाडी पूर्ववत ठेवण्यास काँग्रेस अपयशी ठरल्याने काँग्रेस उमेदवाराचा भंडारा व अर्जुनी/मोरगाव विधानसभा क्षेत्रात दारुण पराभव झाला. तर साकोली विधानसभा क्षेत्रातील उमेदवारास काठावर विजय संपादन करण्याची नामुष्की ओढविली. काँग्रेस ने अनुसूचित जाती जमाती उपवर्गीकरण व क्रिमीलेअर बाबद सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर प्रतिक्रिया दिली असती तर कदाचित महाविकास आघाडीला बहुमत मिळण्याची संधी होती. ती संधी काँग्रेस ने गमावल्याने अनुसूचित जाती जमाती च्या मतदारांनी इतरत्र मतदान केल्याने महायुतीला फायदा होऊन काँग्रेस उमेदवाराला फटका बसल्याच्या जिल्ह्यात चर्चा होत आहेत. 
                    ६ महिन्यापूर्वी पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत भंडारा-गोंदिया लोकसभा निर्वाचन क्षेत्रातून महाविकास आघाडी प्रणित भारतीय राष्ट्रीय काँग्रेस चे उमेदवार डॉ. प्रशांत यादवराव पडोळे यांना तुमसर विधानसभेतून १ लाख २० हजार, भंडारा विधानसभेतून १ लाख २२ हजार ४२८, साकोली विधानसभा क्षेत्रातून १ लाख १७ हजार ५०१ तर अर्जुनी/मोर विधानसभेतून ९१ हजार ४५५ मते मिळाल्याने महायुतीचे उमेदवार सुनील मेंढे यांचेवर तुमसर ९ हजार १६, भंडारा २२ हजार ८५३, साकोली २७ हजार ३६६ व अर्जुनी/मोर २० हजार ६५८ मतांची आघाडी मिळवून विजय संपादन केला होता. या विजयाने मृतावस्थेत असलेल्या काँग्रेस ला नवसंजीवनी मिळाल्याने कार्यकर्त्यांसह नेतेही हुरळून गेले होते. लोकसभा निवडणुकीत संविधान रक्षणाचे नावावर अनुसूचित जाती जमातींच्या मतदारांनी काँग्रेस ला भरभरून मते दिल्याने राज्यात काँग्रेस सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आला होता. लोकसभेच्या निकालानंतर सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांचे अध्यक्षतेखाली ७ सदस्यीय खंडपीठाने ६ विरुद्ध १ मताने अनुसूचित जाती जमातीचे अ, ब, क, ड उपवर्गीकरण करण्यात यावे. तसेच सर्व प्रवर्गांना क्रिमीलेअर लागू करण्याचा निर्णय दिला. राज्यात विरोधी पक्ष असलेल्या महाविकास आघाडी विशेषत्वे काँग्रेस चे प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर प्रतिक्रिया देणे आवश्यक असताना दिली नाही. त्यामुळे सत्ताधारी महायुती व विरोधक महाविकास आघाडी यांच्या संगनमताने हा प्रकार झाल्याचा अनुसूचित जाती जमातीतील मतदारांचा समज झाल्याने काँग्रेस विरोधी भावना तयार झाली. 
                        २६ नोव्हेंबर २०२४ रोजी विधानसभेची मुदत संपुष्टात येत असल्याने १५ ऑक्टोबर रोजी निर्वाचन आयोगाने विधानसभा निवडणुकीची घोषणा केल्याने आदर्श आचारसंहितेस सुरुवात करण्यात आली. महाविकास आघाडी व महायुतीचे घटकपक्ष संयुक्तरीत्या निवडणूक लढवीत असल्याने महाविकास आघाडी कडून भंडारा, साकोली व अर्जुनी/मोर विधानसभा क्षेत्र काँग्रेस ला सोडण्यात आले. तर महायुतीकडून भंडारा शिवसेना, साकोली भारतीय जनता पार्टी व अर्जुनी/मोर राष्ट्रवादी काँग्रेस ह्या घटकपक्षांना सोडण्यात आले. भंडारा विधानसभा क्षेत्रात शिवसेनेचे विद्यमान आमदार नरेंद्र भोंडेकर व काँग्रेस च्या पूजा ठवकर यांच्यात लढत होऊन नरेंद्र भोंडेकर यांना १ लाख २७ हजार ८८४ तर पूजा ठवकर यांना ८९ हजार ५१७ मते मिळाली. त्यात नरेंद्र भोंडेकर यांचा ३८ हजार ३६७ मतांनी विजय झाला. साकोली विधानसभा क्षेत्रात काँग्रेस चे विद्यमान आमदार नाना पटोले व भारतीय जनता पार्टीचे अविनाश ब्राह्मणकर यांच्यात काट्याची लढत होऊन नाना पटोले यांना ९६ हजार ७९५ तर अविनाश ब्राह्मणकर यांना ९६ हजार ५८७ मते मिळाली. त्यात नाना पटोले यांचा २०८ मतांनी निसटता विजय झाला. अर्जुनी/मोर विधानसभा क्षेत्रात राष्ट्रवादी काँग्रेस चे राजकुमार बडोले व काँग्रेस चे दिलीप बनसोड यांचे लढत झाली. राजकुमार बडोले यांना ८२ हजार ५०६ तर दिलीप बनसोड यांना ६६ हजार ९१ मते मिळाली. त्यात राजकुमार बडोले यांचा १६ हजार ४१५ मतांनी विजय झाला. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत काँग्रेस उमेदवाराला मिळालेल्या मतांची तुलना केल्यास भंडारा विधानसभा ३२ हजार ९११, साकोली विधानसभा ३० हजार ७०६ व अर्जुनी/मोर विधानसभेत २५ हजार ४०४ मते काँग्रेस उमेदवारास कमी मिळाल्यामुळे भंडारा व अर्जुनी/मोर येथे काँग्रेस उमेदवाराचा पराभव झाला. तर साकोलीत निसटत्या फरकाने विजय झाला. लोकसभेतील यशामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांनी मतदार राजाकडे दुर्लक्ष केले. तर विधानसभा निवडणुकीवर उपवर्गीकरण आणि क्रिमीलेअर निकालाचे पडसाद जानवल्याचे दिसून येते. काँग्रेस ने विधानसभा निवडणुकीत लोकसभेतील मतदानाची टक्केवारी टिकवून ठेवली नाही. त्यामुळे पराभव झाल्याच्या चर्चा होत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या