पंकज पाटील नाशिक विभागिय संपादक
अमळनेर :-अमळनेर तालुक्यातील कळमसरे पिंपळे बुद्रूक (ता. अमळनेर) येथील अनुदानित आदिवासी आश्रमशाळेने 'मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा २' या स्पर्धेत तालुक्यातून प्रथम क्रमांक मिळवला. यामुळे श्री चिंतामणी संकुलाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
या स्पर्धेत तालुक्यातील अनेक शाळांनी सहभाग नोंदवला होता. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या खाजगी अस्थापनांच्या शाळा गटातून स्वतःची
यशस्वी उत्कृष्टता सिद्ध करत तालुक्यातील अव्वल शाळांना मागे टाकत पिंपळे आश्रमशाळेने आपला अलौकिक ठसा उमटवल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. राज्य सरकारच्या शालेय शिक्षण विभागामार्फत ही स्पर्धा घेण्यात आली होती. ज्यात शालेय भौतिक सुविधा, शैक्षणिक गुणवत्ता, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास, कौशल्यात्मक विकास, दर्जेदार गुणवत्तापूर्ण शिक्षण व शिक्षक उपक्रमशीलतेत वृद्धी, विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीय एकात्मता जोपासना, नियोजनबद्धता व शिस्त
आणि विद्यार्थी व त्या अनुषंगाने शाळेचा सर्वांगीण विकास होणे आदी मुद्द्यांचा समावेश होता. यात पिंपळे आश्रमशाळेने गुणवत्तेचा अतिउच्च नमुना दाखवत तालुक्यात प्रथम क्रमांक मिळविला. प्राथमिकचे मुख्याध्यापक अविनाश अहिरे व माध्यमिकचे मुख्याध्यापक उदय पाटील यांच्या नियोजनातून सर्व शिक्षकांनी शाळेला हा बहुमान मिळवून दिला. याबद्दल संस्थेच्या अध्यक्षा विद्या पाटील, सचिव युवराज पाटील यांनी मुख्याध्यापकांसह सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
0 टिप्पण्या