• पोलिस ठाणे लाखनी येथील पोलिस कर्मचाऱ्याचा प्रताप
• तो पोलिस कर्मचारी शोधण्याचे वरिष्ठांपुढे आव्हान
कालिदास खोब्रागडे, चित्रा न्युज
भंडारा :- जिल्हा पोलिस अधीक्षक नुरुल हसन यांनी अवैध रेती तस्करीवर आळा घालण्याचे प्रत्येक पोलिस ठाण्यांना आदेशित केले असले तरी अवैध रेती उपसा व वाहतूक सुरूच आहे. याचा प्रत्यय लाखनी पोलिस ठाण्याच्या हद्दीत राष्ट्रीय महामार्ग ५३ वरील मिलन ढाबा येथे आला. शुक्रवारी(ता. ६ डिसेंबर) दुपारचे सुमारास पोलिस कर्मचाऱ्यांनी अवैध रेती वाहतूक करणारे टीप्पर पकडले. पण अर्थकारण करून कसलीही कारवाई न करता सोडून देण्यात आले. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या आदेशाची अवहेलना करणारा तो पोलिस कर्मचारी कोण ? याचा शोध घेऊन कारवाई करणे आवश्यक झाले आहे.
जिल्ह्यात वैनगंगा, सुर, बावनथडी व चुलबंद नदी प्रवाहित होत असून या नद्यातील पांढरी शुभ्र व बारीक रेतीमुळे जिल्ह्यासह सीमावर्ती जिल्हे व राज्यातही प्रचंड प्रमाणात मागणी असली तरी रेती घाटाचे लिलाव झाले नसल्यामुळे अवैध रेती तस्करीचा उदय झाला आहे. रेती तस्करांकरवी जिल्ह्यातील रेती घाटातून रेतीचा अवैध उपसा करून विना क्रमांकाचे ट्रॅक्टर व टीप्पर चे साहाय्याने रेती वाहतूक केली जाते. वैनगंगा व सुर नदीपात्रातून करडी/मुंढरी- कोका वन्यजीव अभयारण्य-ऊसगाव-सालेभाटा-लाखनी शहर तसेच चुलबंद नदी खोऱ्यातून पळसगाव-भूगाव-मिरेगाव-मुंडीपार/सडक-लाखनी आणि विहिरगाव- मुरमाडी/तूप-धाबेटेकडी-पोहरा-लाखनी व भूगाव-मुरमाडी/तूप-शिवणी-पिंपळगाव/सडक-लाखनी. त्याचप्रमाणे नरव्हा/पाथरी-खराशी-पालांदूर-पोहरा-लाखनी व मरेगाव-पालांदूर-गुरढा-न्याहारवानी-पेंढरी-पोहरा-लाखनी इत्यादी मार्गाने लाखनी शहर व परिसरात रेती माफियांकरवी रेतीची वाहतूक केली जाते.
या मार्गांवर पोलिस ठाणे करडी, लाखनी साकोली, पालांदूर इत्यादी पोलिस ठाण्यांची हद्द तसेच मोहाडी, लाखनी तालुक्यातील अनेक तलाठी व मंडळ अधिकारी कार्यालय असले तरी अवैध रेती वाहतूक बिनबोभाट सुरू असून यावर प्रतिबंध लावण्याचे सौजन्य पोलिस खनिकर्म व महसूल विभागाकडून दाखविले जात नसल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. नदीपात्रातून रेती माफियांकडून रात्रंदिवस रेती उपसा व वाहतूक सुरू असल्याची माहिती संबंधित विभागाला आहे. पण वरची कमाई बंद होण्याचे भीतीपोटी पुर्णकालीक उपाययोजना केली जात नाही. अवैध रेती वाहतूक करणारे टिप्पर किंवा विना क्रमांकाचा ट्रॅक्टर दिसल्यास रेती माफियाशी मांडवली करून स्वतःचा आर्थिक लाभ करून कसलीही कारवाई न करता वाहन सोडले जाते. या प्रकाराने वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशाला कर्मचाऱ्यांकडून केराची टोपली दाखविली जाते. शुक्रवार(ता.६ डिसेंबर) रोजी दुपारचे सुमारास राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ ने साकोली कडून लाखनी कडे २ रेती भरलेले टीप्पर येत असल्याची माहिती लाखनी पोलिस ठाण्यात कार्यरत काही पोलिस कर्मचाऱ्यांना समजताच त्यांनी मिलन ढाब्याजवळ या रेती वाहतूक करणाऱ्या २ टीप्पर ला अडविले. असे नाव न छापण्याचे अटीवर एका प्रत्यक्षदर्शिने सांगितले. या बाबद पोलिस ठाणे लाखनी येथे संपर्क केला असता रेती चोरीबाबद कसल्याही प्रकारची कारवाई केली गेली नसल्याचे समजले. मग तो रेती वाहतूक करणारे २ टिप्पर अडविनारा पोलिस कर्मचारी कोण ? याचा वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी शोध घेऊन त्यांचेवर कारवाई करणे गरजेचे झाले आहे. जेणे करून भविष्यात अशा घटना टाळता येतील.


0 टिप्पण्या