चित्रा न्युज प्रतिनिधी
सोलापूर:- जिल्हाधिकारी कार्यालय येथे धाराशिव लोकसभा मतदारसंघाचे खासदार मा. ओमप्रकाश राजे निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली बार्शी तालुक्यातील नागरिकांच्या प्रशासनाकडील तक्रारींच्या निवारणासाठी महत्वपूर्ण आढावा बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत पूर्वीच्या तालुकास्तरीय बैठकीतील 113 तक्रारींसह नव्याने प्राप्त झालेल्या 23 तक्रारींचे तातडीने निराकरण करण्यात आले.
खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांच्या प्रभावी पुढाकारामुळे प्रशासनाच्या दिरंगाईमुळे प्रलंबित असलेल्या अनेक कामांवर त्वरीत कार्यवाही झाली. यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला.
बार्शी तालुक्यातील नागरिकांकडून प्रशासनासमोर तहसील कार्यालयाशी संबंधित कामे, सोयाबीन अनुदान, पीक विमा, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण, सार्वजनिक बांधकाम, शिक्षण व कृषी विभाग यांसारख्या विषयांवर तक्रारी मांडण्यात आल्या होत्या.
प्रशासनाच्या सक्षम अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या सर्व तक्रारींवर तातडीने उपाययोजना करण्यात आल्या. यामध्ये नागरिकांच्या विविध अडचणींवर प्रत्यक्ष निर्णय घेत शासकीय योजनांचा लाभ वेळेवर मिळावा यासाठी प्रभावी उपाययोजना करण्याचे निर्देश दिले.
या बैठकीला अप्पर जिल्हाधिकारी मीनाक्षी सिन्हा, निवासी उपजिल्हाधिकारी कुंभार मॅडम, उपविभागीय अधिकारी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत), कृषी अध्यक्ष भोसले, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अजयकुमार भोसले, बार्शी तहसीलदार आणि विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांनी प्रशासनाला नागरिकांच्या समस्या प्राधान्याने सोडवण्याचे निर्देश दिले. तसेच भविष्यात अशा तक्रारी प्रलंबित राहू नयेत यासाठी प्रभावी प्रणाली विकसित करण्याची आवश्यकता आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
नागरिकांच्या अडचणी सोडवण्यासाठी प्रशासनाने तत्परता दाखवली पाहिजे आणि लोकहिताच्या कामांना अधिक गती दिली पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले. बैठकीत उपस्थित अधिकाऱ्यांनी यास सहमती दर्शवली व तक्रारींवर वेगवान निर्णय घेण्याचा निर्धार व्यक्त केला.
या बैठकीच्या निमित्ताने नागरिकांच्या अनेक प्रलंबित समस्या मार्गी लागल्या, प्रशासनाने तत्काळ प्रतिसाद दिल्यामुळे नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण दिसून आले. खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांनी घेतलेल्या पुढाकाराबद्दल उपस्थित नागरिकांनी त्यांचे आभार मानले.
0 टिप्पण्या