चित्रा न्युज प्रतिनिधी
भद्रावती : स्थानिक विवेकानंद माध्यमिक विद्यालयात सन २०२४-२५ या सत्रातील इयत्ता १० वी च्या विद्यार्थ्यांसाठी निरोप समारंभाचा कार्यक्रम दिनांक १२ फेब्रुवारी रोजी पार पडला.
इयत्ता १० वी साठी एसएससी बोर्ड परीक्षा दिनांक २१ फेब्रुवारी पासून सुरु होत आहे. त्या अनुषंगाने परिक्षेला सामोरे जाणाऱ्या विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवून त्यांना निरोप व शुभेच्छा देण्यासाठी ह्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक विजय लांबट आणि प्रमुख अतिथी स्थानी सेवानिवृत्त शिक्षक बळवंत पावडे हे होते. त्याचप्रमाणे विद्यालयातील शिक्षक वृंद कल्पना बांदूरकर, आशा गावंडे, दयाकर मग्गीडवार आणि तुकाराम पोफळे हे सुध्दा मंचावर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक कल्पना बांदूरकर यांनी केले. आपल्या प्रस्ताविकातून त्यांनी परिक्षे दरम्यान काटेकोरपणे पाळावयाच्या विविध बाबी, घ्यावयाची काळजी याविषयी माहिती दिली.
इयत्ता १० वी तील शाहीन पठाण, लक्ष्मी रंदये, रंजना कुर्वे आदी विद्यार्थिनींनी आपल्या मनोगतातुन विद्यालय व शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त केल्या.
दयाकर मग्गीडवार यांनी प्रसिद्ध हिंदी कवी श्री हरिवंशराय बच्चन यांच्या "कोशिश करनेवालों की कभी हार नहीं होती" या कवितेद्वारा विद्यार्थ्यांना प्रेरणा देण्याचा प्रयत्न केला.
प्रमुख अतिथी बळवंत पावडे यांनी विविध अनुभवांद्वारे विद्यार्थ्यांना परीक्षेत सुयश प्राप्त करण्याचा मंत्र दिला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक विजय लांबट यांनी एकलव्य व द्रोणाचार्य यांच्या कथेद्वारा गुरू शिष्य परंपरेचे महिमामंडन केले.
या प्रसंगी इयत्ता १० वी च्या विद्यार्थ्यांनी विद्यालयासाठी भेटवस्तू सप्रेम भेट दिल्या.
कार्यक्रमाचे संचालन आणि आभार प्रदर्शन अनुक्रमे इयत्ता नववी व आठवीच्या विद्यार्थिनी आस्था बारतीने व किरण पिंपळकर यांनी केले.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विनोद गावंडे, रामदास ठक, विश्वनाथ हरबडे, बंडू कांबळे यांनी मोलाचे सहकार्य केले.
0 टिप्पण्या