Ticker

6/recent/ticker-posts

बापावर मुलाकडून प्राणघातक हल्ला

बार्शी शहरातील संतापजनक घटना उघड

चित्रा न्युज प्रतिनिधी 
 सोलापूर :–बार्शी शहरात एक हृदयद्रावक आणि संतापजनक घटना समोर आली असून, एका ७९ वर्षीय वृद्धावर त्यांच्या स्वतःच्या मुलाने प्राणघातक हल्ला केल्याची तक्रार नोंदवण्यात आली आहे. या प्रकरणी बार्शी शहर पोलीस ठाण्यात प्रथम खबर अहवाल दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी आरोपीविरोधात भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

ही घटना दि. ४ एप्रिल रोजी सकाळी ९:१० वाजण्याच्या सुमारास बार्शीतील विठ्ठल नगर भागात घडली. तक्रारदार विलास लक्ष्मण कौठाळकर (वय ७९) हे नेहमीप्रमाणे आपल्या घरासमोरील फुलझाडावरून फुले तोडत होते. त्यांना देवपूजेचा छंद असून, रोज सकाळी फुले गोळा करण्याची त्यांची सवय आहे.

दरम्यान, त्यांचा मुलगा सचिन विलास कौठाळकर तेथे आला आणि त्याने संतापाच्या भरात झाड तोडून टाकले. विलास यांनी त्याला विचारणा केली असता, सचिनने तुटलेली झाडाची फांदी घेऊन त्यांच्या डोक्यावर जोरात मारले. या मारहाणीत विलास यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.

हल्ल्यानंतर सचिनने वडिलांना धमकावले की, "कुठेही जायचे नाही, घरातच थांबायचे." त्यामुळे भीतीपोटी दोन दिवस ते घरातच राहिले. प्रकृती थोडी सुधारल्यानंतर ६ एप्रिल रोजी त्यांनी पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली.

या घटनेवरून बार्शी शहर पोलीस ठाण्यात FIR क्र. ०३३३ नोंदवण्यात आली आहे. आरोपी सचिन याच्याविरुद्ध BNS कलम ११८(१), ३५१(२) आणि ३५१(३) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक बालाजी अंकुश कुकडे यांनी तपास सुरू केला असून, लवकरच आरोपीस अटक होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

विलास कौठाळकर हे गेली अनेक वर्षे एकटेच राहतात. त्यांच्या पत्नीचे निधन १९९३ मध्ये झाले असून, ते चणे-फुटाणे विकून आपला उदरनिर्वाह करतात. त्यांच्या मुलासोबत वैयक्तिक वाद असून, तो शेजारीच वेगळे राहत आहे. तक्रारीत त्यांनी असा संशयही व्यक्त केला आहे की, शेजारी धनाजी अंधारे व संजय साबळे हे सचिनला दारू पाजून त्याच्या हातून हल्ला करवतात.

या घटनेने संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली असून, वृद्ध वडिलांवर झालेल्या हल्ल्याबद्दल नागरिकांमध्ये तीव्र निषेध व्यक्त होत आहे. वृद्ध व्यक्तींच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. पोलिसांनी तत्काळ आरोपीविरोधात कठोर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या