चित्रा न्युज प्रतिनिधी
सोलापूर : येत्या १४ एप्रिल २०२५ रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी होत आहे. दरवर्षीप्रमाणे या दिवशी बार्शी शहरात मध्यवर्ती जयंती उत्सव समितीच्या वतीने भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात येते. या पार्श्वभूमीवर पोलीस निरीक्षक बालाजी कुकडे यांच्या नेतृत्वाखाली मिरवणुकीच्या मार्गाची सविस्तर पाहणी करण्यात आली.
या पाहणीदरम्यान मिरवणूक मार्गावरील रस्त्यांची सद्यस्थिती, खड्डे, विद्युत खांबांवरील तारा, रस्त्यावर पडलेली वाळू तसेच रस्त्यालगत झाडांच्या फांद्यांमुळे निर्माण होणारे अडथळे याची नोंद घेण्यात आली. यासंदर्भात संबंधित विभागांशी पत्रव्यवहार करून आवश्यक त्या सुधारणा तातडीने करण्यात याव्यात, अशा सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या.
या पाहणीदरम्यान तहसीलदार एफ. आर. शेख, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे अधिकारी तगारे, बार्शी नगर परिषदचे उपमुख्याधिकारी विठ्ठल पाटोळे, तसेच मध्यवर्ती डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीचे सदस्य उपस्थित होते.
पोलिस प्रशासन आणि शासकीय यंत्रणेद्वारे समन्वय साधून यंदाचा जयंती उत्सव आणि मिरवणूक कोणत्याही प्रकारच्या अडथळ्यांशिवाय शांततेत आणि सुसंघटितरीत्या पार पाडण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत, अशी माहिती पोलीस निरीक्षक बालाजी कुकडे यांनी दिली.


0 टिप्पण्या