Ticker

6/recent/ticker-posts

पतीसह तिघांकडून विवाहितेचा छळ ...जबरदस्तीने मुंडण करीत शारीरिक व मानसिक त्रास

 

चित्रा न्युज प्रतिनिधी
सोलापूर :-बार्शी शहरातील धर्माधिकारी प्लॉट येथे राहणाऱ्या एका विवाहितेवर पती, नणंद आणि मेव्हण्याने वारंवार मानसिक व शारीरिक छळ करत जबरदस्तीने मुंडण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी विवाहितेने बार्शी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे.

फिर्यादीने दिलेल्या माहितीनुसार, तिचे लग्न २०१६ साली झाले होते आणि तिच्या पतीसोबत संसार सुरळीत चालू होता. मात्र, काही महिन्यांपासून नणंद व मेव्हण्याच्या वर्तणुकीत मोठा बदल दिसून येत होता. मेव्हण्याचे नणंदेबरोबर अनैतिक संबंध असल्याचे तिला समजले. ही बाब तिने पतीला सांगितली असता, पतीने तिच्या आरोपांवर विश्वास ठेवण्याऐवजी तिच्यावरच संशय घेत शारीरिक व मानसिक छळ सुरू केला.

दि. ८ मार्च २०२५ रोजी रात्री आठच्या सुमारास पती, नणंद व मेव्हण्याने एकत्र येत तिला बेदम मारहाण केली. मेव्हण्याने तिचा गळा दाबण्याचा प्रयत्न केला, नणंदेने तिचे केस ओढले आणि पतीने लाथाबुक्यांनी मारत तिचे चारित्र्यावर संशय घेतला. त्यानंतर पतीने रागाच्या भरात तिच्या भुवयांवरून ट्रिमर फिरवत चेहरा विद्रुप केला आणि जबरदस्तीने मुंडण करण्यास भाग पाडले.

याप्रकरणी त्रास असह्य झाल्याने विवाहितेने तिच्या बहिणीकडे धाव घेतली. पती व मेव्हण्या यांनी कोणाकडे काही सांगितल्यास तिला व तिच्या कुटुंबीयांना ठार मारण्याची धमकी दिल्याने ती आतापर्यंत गप्प बसली होती. मात्र, अखेर तिने हिंमत दाखवत बार्शी पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पती, नणंद व मेव्हण्याविरोधात विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. या घटनेने संपूर्ण बार्शी शहरात खळबळ उडाली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या