Ticker

6/recent/ticker-posts

आशा, ऊर्जा आणि प्रेरणा देणारी टीम आजरा, चंदगड, गडहिंग्लज


चित्रा न्युज प्रतिनिधी 
कोल्हापूर:-गेली अनेक वर्षे आजरा चंदगड गडहिंग्लज तालुक्यात अंधश्रद्धा निर्मूलनाचे संघटनात्मक काम उभे रहावे यासाठी या तालुक्यांतील काही साथींसह महाराष्ट्र अंनिस कोल्हापूर जिल्ह्यातील संघटक प्रयत्न करत आहोत. अनेक कारणांनी या प्रयत्नांना यश मिळत नव्हते. संघटनात्मक काम उभे करण्याच्या प्रयत्नांत नेमक्या काय गोष्टी चुकतात, कार्यपद्धतीत काय बदल करायला पाहिजेत हे लक्षात येत नव्हते पण यश मिळत नाही म्हणून आमच्यापैकी कुणीही चिकाटी आणि जिद्द सोडली नव्हती. आजरा तालुक्यात संजय घाटगे, काशिनाथ मोरे, चंदगड तालुक्यात प्रा एम एस दिवटे, परसू गावडे, नरेंद्र पाटील, गडहिंग्लज तालुक्यात राजेंद्र पताडे या कार्यकर्त्यांचे त्यांच्या पातळीवर प्रयत्न आणि जिल्हा म्हणून आमचा त्यांच्याबरोबर सातत्याने संवाद, संपर्क यामाध्यमातून या तिन्ही तालुक्यांत संघटनात्मक काम उभे रहावे यासाठी प्रयत्न सुरूच होते.
 
यावर्षी जिल्हा प्रेरणा मेळाव्याच्या निमित्ताने तत्कालीन जिल्हा कार्याध्यक्ष रेश्मा बरोबर या शाखांना भेटी द्यायला गेलो तेव्हा नव्याने सभासद नोंदणी केलेल्या कार्यकर्त्यांनी संघटनेचा विचार, कार्यपद्धती आणि उपक्रम समजून घेण्याची आणि त्यासाठी एखादे प्रशिक्षण घेण्याची इच्छा व्यक्त केली. खरंतर नव्या कार्यकर्त्यांनी अशा प्रकारच्या प्रशिक्षणाची इच्छा व्यक्त करणे हेच आमचा उत्साह वाढवणारे होते. या भेटीमध्येच पुढील कॅलेंडर पाहून 18 एप्रिल हा सुट्टीचा दिवस प्रशिक्षणासाठी निश्चित केला. त्याप्रमाणे प्रशिक्षणात नेमके काय घ्यायचे, कसे घ्यायचे याचा विचार आणि चर्चा सुरू झाली. याआधी 16 मार्च रोजी कोल्हापूर येथेही एक कार्यकर्ता प्रशिक्षण झाले होते. या प्रशिक्षणालाही चांगला प्रतिसाद मिळाला होता पण प्रशिक्षणाचे तंत्र आणि आशय यामध्ये काही बदल करण्याची गरज लक्षात आली होती. त्यानुसार काही वर्षांपूर्वी सुनील स्वामी सर प्रशिक्षण विभागाचे राज्य कार्यवाह असताना त्यांनी develop केलेले प्रशिक्षणाचे मॉडेल पुन्हा एकदा सुरू करावे या निर्णयापर्यंत आलो. पण त्यावेळचे प्रशिक्षण हे दोन दिवसांचे आणि निवासी होते. आता एक दिवसाचे संक्षिप्त मॉडेल विकसित करणे आवश्यक होते. शिवाय यावेळी प्रशिक्षणात सहभागी होणारे कार्यकर्ते हे तसे नवे होते. या सर्व गोष्टींचा विचार करून एक नवे छोटे मॉडेल तयार केले. प्रशिक्षण देणारे कार्यकर्ते प्रशिक्षक म्हणून नवे, प्रशिक्षण घेणारे कार्यकर्ते नवे आणि या सर्वांसाठी प्रशिक्षणाचे मॉडेल ही नवे असा काहीसा हा प्रयोग होता. प्रशिक्षणासाठी येणारे कार्यकर्ते वेळेत आले आणि त्यांनी दिवसभराचा पूर्ण वेळ दिला तर हे प्रशिक्षण भारी होणार याची खात्री होती.
 
नियोजनानुसार पुरेशा आधी प्रशिक्षणाची पोस्ट तयार होऊन संबंधित सर्व ग्रुप मध्ये पडली. पहिले काही दिवस या पोस्टला काहीच प्रतिसाद मिळणे. पूर्व नोंदणी झाल्याशिवाय प्रशिक्षण होईल याची खात्री होऊ शकत नव्हती. प्रशिक्षणाच्या आवाहनाला पुरेसा प्रतिसाद मिळत नाही हे पाहून आजरा, चंदगड, गडहिंग्लज तालुक्यात संघटनात्मक काम उभे करण्याचा आणखी हा एक प्रयत्न फसणार अशी शंका येऊ लागली. पूर्व नोंदणी साठी या शाखांतील संघटक असणाऱ्या कार्यकर्त्यांशी पुन्हा बोलून घेतले. यानंतर सर्वजण जोमाने कामाला लागले. अवघ्या तीन, चार दिवसांत नोंदणीने 60 चा आकडा ओलांडला. कार्यकर्त्यांचा हा उदंड प्रतिसाद पाहून आमचासुद्धा उत्साह वाढला. अर्थात नोंदणी केलेले सर्वजण प्रशिक्षणासाठी उपस्थित राहतीलच असे नाही याचा पूर्वानुभव आणि त्यामुळे तशी मानसिक तयारी सुद्धा होती.
 
प्रत्यक्ष प्रशिक्षणाचा दिवस उजाडला तेव्हा कोल्हापूरातून निघताना नोंदणीच्या 40, 50 % कार्यकर्ते आले तरी समाधानकारक संख्या असेल अशी मनाची तयारी ठेवून प्रवास सुरू केला. प्रशिक्षण सुरू होण्याची वेळ सकाळी 9 ची होती मात्र 10, 10:15 पर्यंत खूपच कमी उपस्थिती दिसत होती. 62 जणांनी नोंदणी करूनसुद्धा 20 तरी कार्यकर्ते येतील की नाही अशी शंका येऊ लागली. पण 10:15 नंतर कार्यकर्त्यांचा ओघ वाढला आणि संख्या 40 वर पोहोचली. *अंनिसच्या पंचसूत्रीचे Treasure Hunting* करत उत्साहात आणि दिमाखात प्रशिक्षणाचे उद्घाटन झाले.
उद्घाटनाच्या सत्रानंतर झालेली गटचर्चा आणि त्यानंतर गटचर्चेच्या सादरीकरणात च घेतलेले ओळखीचे सत्र अपेक्षेपेक्षा खूपच लांबले पण या निमित्ताने प्रशिक्षणात सहभागी कार्यकर्त्यांना मोकळेपणाने बोलण्याची संधी मिळाली आणि आम्हाला त्यांची सविस्तर ओळखही झाली. त्यानंतर संघटनेच्या भूमिकेविषयी साक्षात डॉ नरेंद्र दाभोलकर यांनी (त्यांच्या व्हिडिओ च्या माध्यमातून) सर्वांना मार्गदर्शन केले. भोजनानंतर शाखेची मीटिंग कशी असावी याचा demo दाखवला गेला आणि शेवटच्या सत्रात कार्यकर्ता म्हणून कोणती कौशल्ये आत्मसात केली जाऊ शकतात, करायला पाहिजे याची चर्चा झाली. तसेच आपली आवड, क्षमता, काम (नोकरी/व्यवसाय) आणि प्रबोधन यांची सांगड कशी घालता येईल याविषयी सुद्धा गप्पा झाल्या. 

सभोवताली सगळे कसे वाईट चालले आहे असा परिस्थितीला केवळ दोष देत न बसता आपल्या क्षमतेप्रमाणे परिस्थिती बदलण्यासाठी प्रयत्न करण्याचा संकल्प करून *"होंगे कामयाब..."* गीताने प्रशिक्षणाचा समारोप झाला. औपचारिक समारोप झाला तरी परिसरात रेंगाळत एकमेकांची ओळख करून घेणारे, पुढील कामाचे नियोजन, चर्चा करणारे, आनंदी चेहरे हे प्रशिक्षक म्हणून आमचे अमूल्य मानधन होते. 

या प्रशिक्षण शिबिराला आपापल्या शाखेची चांगली उपस्थिती राहावी यासाठी चंदगड शाखेचे प्रा एम एस दिवटे, स्मिता शेटकर, सचिन पिटुक, आजरा शाखेचे काशिनाथ मोरे, संजय घाटगे, गीता पोतदार, गडहिंगलज शाखेचे राजेंद्र पताडे, संजय केसरकर, ओमप्रकाश जाधव यांनी विशेष प्रयत्न केल्याचे सातत्याने जाणवत होते. विशेष म्हणजे यावेळी प्रशिक्षणाला आजरा, गडहिंग्लज शाखेचे अध्यक्ष पूर्णवेळ उपस्थित होते. तसेच कपिल मुळे, ओमप्रकाश जाधव आणि राजेंद्र पताडे यांच्या प्रयत्नातून सर्व प्रशिक्षणार्थ्यांना उत्तम नाष्टा, चहा आणि जेवण मिळाले.
प्रशिक्षणाचे ठिकाण मिळण्यासाठी नेसरीचे एस एस मठकर सर, एस एस हायस्कूल, नेसरी चे अध्यक्ष हेमंत कोलेकर साहेब, मुख्याध्यापक कालकुंद्रीकर सर यांचीही विशेष मदत झाली. 

प्रशिक्षकांमध्ये जिल्ह्याचे नेतृत्व केलेली रेश्मा खाडे, करवीर शाखेचे कार्याध्यक्ष संघसेन जगतकर, प्रशिक्षण व्यवस्थापन विभागाचे जिल्हा कार्यवाह निशांत सुनंदा विश्वास आणि कोल्हापूर शहर शाखेचे प्रधान सचिव राहुल शिंगे यांनी आपले भरीव योगदान दिले.

एकंदर काय तर हे प्रशिक्षण कामाची नवी आशा, ऊर्जा आणि प्रेरणा देणारे ठरले.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या